
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौरा केला. यावेळी भाजप लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱयांसह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांची हजेरी असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. गर्दीमुळे या दौऱयाला मेळाव्याचे स्वरूप आले होते.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे सकाळी आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी सुमारे तीनशे भाजप कार्यकर्ते हजर होते. यानंतर त्यांचा ताफा जिल्हा शासकीय रुग्णालयात गेला. गर्दीमुळे त्यांनी तेथील कोविड सेंटरची प्रवेशद्वारावरून पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून माहिती घेतली. यानंतर त्यांनी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयाच्या कोविड सेंटरला भेट दिली. महसूल आयुक्त कार्यालयात महसूल आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह आमदार, महापौर, उपमहापौर, महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक हजर होते. शहर व जिह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते असे किमान दोन-अडीचशेजणांची गर्दी प्रत्येक ठिकाणी होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाच, पण या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दौरा होता की भाजपचे मेळावे होते, अशी चर्चा रंगली होती.





























































