देवेंद्र फडणवीस यांना 4 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी प्रकरणे लपविल्याबद्दल प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 29 नोव्हेंबर रोजी समन्स बजावला होता. परंतु, सदर प्रकरण मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी (सीजेएमएफसी) कोर्टात वर्ग करून घेतले आहे.

याप्रकरणी देवेंद्र फडणवीस व ऍड. सतीश उके यांना सदर प्रकरण सीजेएमएससी कोर्टात वर्ग झाल्याचे कळवावे तसेच त्यांना नोटीस बजावून फडणवीस यांना येत्या 4 जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश द्यावेत, असे आदेश मंगळवारी मुख्य न्यायदंडाधिकारी सातव यांनी न्यायदंडाधिकारी मोरे यांना दिलेत.

मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार सदर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या त्रिकोणी पार्क, धरमपेठ येथील निवासस्थानी जाऊन समन्स बजावला होता. परंतु, आता सातव यांनी प्रकरण आपल्या कोर्टात वर्ग करून घेतले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी प्रकरण लपविल्याप्रकरणी ऍड. सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात फौजदारी प्रकरण दाखल केले होते.