दाऊदच्या हस्तकाशी व्यवहार करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांबद्दल तुमची भूमिका काय? विरोधकांनी फडणवीसांना घेरले

नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत, तशाच भावना प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत काय?

नवाब मलिक यांच्या सत्ताधारी गटातील समावेशाला विरोध करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलेच कोंडीत पकडले. मलिकांबाबत विरोधाची भूमिका घेतलीत. मग कुख्यात दाऊद इब्राहिमच्या हस्तकासोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल तुमची भूमिका काय, असा खडा सवाल दानवे यांनी केला. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ही नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही, असा हल्ला फडणवीस यांच्यावर केला.

नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत सत्ताधारी बाकावर जाऊन बसले होते. त्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. आज दानवे यांनी फडणवीस यांना पत्र लिहून प्रफुल्ल पटेलांबद्दलही भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत, तशाच भावना प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत काय? याचा खुलासा आपल्याकडून होणे गरजेचे आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अशी आशा बाळगतो, असेही दानवे यांनी या पत्रात नमूद केले.

नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही

माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात? असा सवाल करुन फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे घरही जप्त केलेले आहे मग प्रफुल्ल पटेलांबद्दल फडणवीस यांची भूमिका काय? ते फडणवीसांनी जाहीर करावे असेही पटोले म्हणाले.

विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याने त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण विरोध केलात. आपण नैतिकता व राष्ट्रवाद याबाबत किती पक्के आहात हेच यातून दिसले, पण अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. याच पटेल यांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत व दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ‘ईडी’ने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे याकडे दानवे यांनी पत्रात फडणवीस यांचे लक्ष वेधले.

नवाब मलिक दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी बाकावर

दाऊदशी संबंध जोडून देशद्रोहाचा आरोप करण्यात आलेले आमदार नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपची चांगलीच कोडी झाली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या फुटीर गटाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक पुन्हा सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसलेले दिसले. इतकेच नाही, तर मलिक यांनी अजित पवार यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चाही केली.