
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून मतदार याद्यांमधील घोळावर भाष्य केले.
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याद्यांमध्ये अनेक घोळ आहे हे आम्ही देखील दाखवले, पण त्याकरता निवडणुका घ्यायच्या नाहीत असे करता येणार नाही. गेले 20-25 वर्ष निवडणुका लढत आहेत त्यांना माहिती आहे की, कमी-अधिक प्रमाणात याद्यात घोळ असतो. एसआयआर सुरू झाल्यावर याद्यांतील घोळ कमी होईल. पुढील काळात निवडणूक आयोगाने आपल्या याद्या ब्लॉक चेनमध्ये टाकाव्या. या पद्धतीने याद्या तयार झाल्या तर घोळ कायमचा संपेल, असेही फडणवीस म्हणाले.
…हे लोकशाहीला अभिप्रेत नव्हते
राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित केल्याचा आनंद आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 15 जानेवारीला राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. या निर्णयाचे स्वागत करतो. कारण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या भरवशावर चालणे हे लोकशाहीला अभिप्रेत नव्हते. न्यायालयाच्या निर्णयामुळे दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींविना होत्या. आता पुन्हा निवडणुका होत आहेत, असे ते म्हणाले.
पुण्यात भाजप-अजित पवार गट समोरासमोर
आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती होईल. काही ठिकाणी भाजप-शिंदे गट, अजित पवार गटाची युती होईल. एखाद ठिकाणी भाजप-अजित पवार गटाची युती होताना पाहायला मिळेल. पुण्यामध्ये मात्र अजित पवार गट आणि आमची चर्चा झाली. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. कदाचित भाजप-अजित पवार गट समोरासमोर लढताना पाहायला मिळतील. मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यात कटुता नसेल, असेही फडणवीस म्हणाले.
निवडणूक आयोगाचा घोळ सुरूच! महानगरपालिका निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदारयादी वापरणार
50 टक्क्यांवर आरक्षण
नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूरमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या वर गेलेले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, यांच्या निवडणुका घ्या, फक्त निकाल आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. अंतिम निर्णय जो घेऊ त्या या दोन महानगरपालिकांना लागू असेल, असेही फडणवीस एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.



























































