यंदाची निवडणूक राष्ट्रीय सुरक्षेची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-devendra-fadnavis

सामना प्रतिनिधी, येवला

देशाची ही सर्वात मोठी निवडणूक असून जशी ती विकासाची आहे तसेच राष्ट्रीय सुरक्षेचीदेखील आहे. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करून देशाला हिंदुस्थानची ताकद दाखवली आहे. 60 वर्षे सत्ता भोगणाऱया काँग्रेसच्या आजच्या महाखिचडीचे जाहीरनामे पाहिल्यास यांच्याकडे मुद्दाच नाही अशी टीका करतानाच काँग्रेस व गांधी परिवाराची गरिबी हटाओची घोषणा ही उसनवारीची आहे अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या पटांगणात आज झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, सीमा हिरे, माजी आमदार मारोतराव पवार, संजय पवार, माजी सभापती संभाजी पवार, उपसभापती रूपचंद भागवत, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, सुहास कांदे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, येथे प्रत्येक सभेचा एकच विषय असतो तो म्हणजे पाणी. पण पंधरा वर्षे भुजबळांनी फक्त आश्वासने दिली. मग पाणी कोणाला दिले असा सवाल करून मांजरपाडय़ाला पाणीदार मंत्री गिरीश महाजन यांनी 350 कोटींचा निधी दिल्याने बोगदा पूर्ण झाला. पहिला पाऊस पडताच या बोगद्यात पाणी आलेले असेल, असेही फडणवीस म्हणाले. यापुढील काळात नारपार प्रकल्प हाती घेणार असून गुजरातला आघाडीच्या सरकारने दिलेले पाणी महाजन यांनी परत आणले आहे असे सांगत ‘मांजरपाडा तो झाकी है, नारपार अभी बाकी है’, असेही फडणवीस म्हणाले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे की आम्ही एक रुपया दिला की शेवटच्या घटकापर्यंत पंचवीस पैसे जातात, मात्र मोदीनी गेल्या पाच वर्षांत ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या तत्त्वाने जनधन खात्यात 80 हजार कोटी रुपये लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेतून दिले अन् थेट खात्यात पैसे जमा करून गैरमार्गाना तिलांजली दिली असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, आत्माराम कुंभार्डे, अजित ताडगे, सुहास कांदे, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, युवानेते कुणाल दराडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रतन बोरणारे, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, भाजपचे शहर प्रमुख आनंद शिंदे, राजेद्र परदेशी, नगरसेवक प्रमोद सस्कर, बाबा डमाळे, भास्कर कोंढरे, धीरज परदेशी, समीर समदडिया, छगन आहेर, राजाभाऊ अहिरे, अरुण काळे, युवराज पाटोळे, मीनानाथ पवार, रूपाली परदेशी, कविता आठशेरे, अरुण काळे आदी उपस्थित होते.

विरोधकांना चिमटा
भुजबळ मोदींच्या नकला करतात पण देश घडविण्याची ताकद आणि सुरक्षेची ताकद मोदींमध्येच आहेत. नकला करून काहीही साध्य होत नाही असा चिमटा फडणवीस यांनी घेतला. बॅट घेऊन अन् पॅड लावून बसलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार बारावा खेळाडू म्हणून पॅव्हेलियनमध्येच आहेत यावरूनच विरोधी पक्षांची झालेली अवस्था दिसून येते. आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यांतील निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचे स्पष्ट दिसत असून यापुढे तर त्यांची नक्कीच वाताहत होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.