
एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासोबत राहावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे. खडसे अनुभवी आहेत. त्यांना राजकारण चांगले कळते, त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील, असे सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भवितव्यावर भाष्य केले. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, किशोर पाटील, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, राजुमामा भोळे, हॉस्पिटलचे संचालक महेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कोंडी केल्यामुळे खडसे पक्ष सोडणार असल्याचेही बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस व खडसे एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर फडणवीस यांनी खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासोबतच राहावेत अशी सर्वांची इच्छा आहे. खडसे अनुभवी आहेत. त्यांना राजकारण चांगले कळते, त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील असे शेलके भाष्य करून या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले.
खडसेंनी कार्यक्रमाकडे फिरवली पाठ
एकनाथ खडसे हे भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्यातही गिरीश महाजन व खडसे यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे निमंत्रणच खडसेंना देण्यात येते की नाही याबद्दल साशंकता होती. परंतु खडसे यांना कार्यक्रमाचे रीतसर निमंत्रण देण्यात आले. परंतु एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.




























































