क्रिकेट, फुटबॉल पाठोपाठ हॉकीच्या मैदानावरही देवरुखच्या सुपुत्राची करामत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवरुख

अखंड जगभरातील हॉकीप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी पुरुषांची हॉकी विश्वचषक स्पर्धा ओडीसातील भुवनेश्वर येथे सुरू झाली. जागतिक पातळीवरील महत्वाच्या मानल्या जाणार्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यातील मुख्य कार्यक्रमात ग्राउंड कोरिओग्राफी करण्याचा मान रत्नागिरी जिल्ह्याच्या देवरूखमधील देवेंद्र शेलार या कोकणी सुपुत्राला मिळाला. क्रिकेट, फुटबॉल पाठोपाठ हॉकीच्या मैदानावरही कोकणच्या सुपुत्राने आपली छाप पाडली आहे.

मुळचा रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील सांगवे गावाचा रहिवासी असलेला देवेंद्र देवरूखचाही नागरिक आहे. वडिलांच्या नोकरीमुळे बालपणापासूनच तो मुंबईत वास्तव्याला असतो. गावाकडची ओढ म्हणून सणासुदीला तो गावी येतो. मराठीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सौ. दीपाली विचारे ही देवेंद्रची सख्खी मोठी बहीण. आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत तो या क्षेत्रात उतरला. मात्र त्याने चित्रपट अथवा दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमांमध्ये नृत्य दिग्दर्शन करण्यापेक्षा ग्राउंड कोरिओग्राफी हे सर्वांत आव्हानात्मक क्षेत्र स्वीकारले.

बहिणीच्या प्रेरणेतून त्याने 1994 साली झालेले पुणे नॅशनल गेम्समध्ये छोटेखानी ग्राउंड कोरिओग्राफी केली. याचवेळी सलग 10 वर्षे पुण्यातील मानाचे गणेशोत्सवात विविध मंडळातर्फे सादर होणार्या रस्त्यावरील कार्यक्रमांची कोरिओग्राफी तो करत होता. हैदराबाद येथे 2000 साली झालेले नॅशनल गेम्स, 2003 मध्ये हैदराबाद येथे झालेले आफ्रो एशियन गेम्स, 2004 साली झालेले आसाम नॅशनल गेम्स अशा स्पर्धा करतानाच 2006 साली त्याला परदेशात आपल्या कलेची छाप पाडण्याची संधी मिळाली. त्यावेळी ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा समारोप देवेंद्रच्या कार्यक्रमाने झाला. 2008 साली झालेल्या पुणे येथील युथ कॉमनवेल्थ गेम्स, दिल्ली येथे सन 2010 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोपाच्या दोन्ही कार्यक्रमात देवेंद्रने आपल्या ग्राउंड कोरीओग्राफीने रंगत आणली होती.

सन 2015 साली दिल्लीत झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात देवेंद्रला थेट तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसमोर चमकण्याची संधी मिळाली होती. यानंतर आता छोटे मोठे इव्हेंट करतानाच त्याला आयपीएलच्या रूपाने क्रिकेटच्या मैदानावर आपली कोरीओग्राफी दाखवायची संधी मिळाली याचेच सोने करीत देवेंद्रने 2017 आणि 2018 च्या आयपीएल उद्घाटन कार्यक्रमात नृत्यदिग्दर्शनातील आपला जलवा पुन्हा एकदा सिद्ध केला.

गतवर्षी शिलाँगच्या मेघालय मिशन फुटबॉल स्पर्धेत त्याने 14 आणि 17 वयोगटाखालील तब्बल 1200 खेळाडूंना एकत्र आणत उद्घाटन सोहळ्याची अदाकारी सादर केली होती.

ओडीशातील भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडीयमवर पुरुषांच्या हॉकी विश्वचषकाचा थरार सुरु झाला. क्रिकेट, फुटबॉलपाठोपाठ सर्वांत लोकप्रिय असलेल्या हॉकीच्या मैदानावरही देवेंद्रचा जलवा सर्वांना पाहता आला. प्रत्यक्ष रंगमांचावर 200 नृत्य कलाकार आणि मैदानात 1100सहकलाकारांना घेऊन त्याने आपली कलाकारी सिद्ध केली.

क्रिकेट आणि फुटबॉल पाठोपाठ जगात प्रसिद्ध असलेल्या हॉकीच्या विश्वचषक स्पर्धेत आपणाला नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी मिळाली हे भाग्यच आहे. ग्राउंड कोरिओग्राफी हे आव्हानात्मक क्षेत्र आहे. यात मला नृत्यदिग्दर्शक शामक दावर यांची साथ लाभते. यापुढेही असेच काम करत राहून कोकणचे नाव उज्ज्वल करणार – देवेंद्र शेलार