
देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हाहाकार उडविला असून सौंदाळे येथे उत्पन्न देणारी मोठी कलमे मुळासहीत उन्मळून पडल्याने सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले. पडेल येथे घरावर चिंचेचे झाड कोसळून सुमारे 85 हजाराचे नुकसान झाले.
देवगड तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडला.वादळी वारा व मुसळधार पाऊस यामुळे सौंदाळे ताम्हणकरवाडी येथे गुरूवारी दुपारी 12 वा.सुमारास सुरेखा सुर्यकांत पेडणेकर यांच्या जागेतील 10 मोठी हापूस कलमे वादळी वाऱ्याने मुळासहीत उन्मळून पडली. कलमे उन्मळून पडल्याने सुमारे 4 लाखाचे नुकसान झाले असून तलाठी प्रमोद कोळपकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
चंद्रकांत तुकाराम येरम यांच्या राहत्या घरावर गुरूवारी दुपारी 3 वा.सुमारास चिंचेचे झाड उन्मळून पडल्याने सुमारे 85 हजाराचे नुकसान झाले. तर मळेगाव येथील रविंद्र सोनू खरात यांच्या राहत्या घराची कौले व पत्रे फुटून नुकसान झाले. गुरूवारी सकाळी 125 मिमी पावसाची नोंद झाली.




























































