देवगड समुद्रात बुडालेल्या सहाव्या तरुणाचा मृतदेह सापडला

देवगड समुद्रात बुडालेल्या रामचंद्र घनश्याम डिचोलकर याचा मृतदेह तब्ब्ल 24 तासांनी रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास देवगड स्मशानभुमीसमोर समुद्राच्या पाण्यात खडकाळ भागात सापडला. शनिवारी देवगड समुद्रात पोहत असताना रामचंद्र व आणखी चार विद्यार्थीनींचा बुडून मृत्यू झाला. त्यातील चौघींचे मृतदेह सापडले तर रामचंद्र बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह सापडला आहे.

पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड पर्यटनासाठी आली होती. या सहलीमधील विद्यार्थ्यांना समुद्रस्नानाचा आनंद लुटण्याचा मोह आवरला नाही.हे विद्यार्थी पाण्यात उतरून आनंद घेत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्याने यातील सहाही जण बुडाले. शनिवारी पाण्यात बुडून मयत झालेल्या चारही विद्यार्थीनींचा मृतदेहांचे शवविच्छेदन करून रविवारी दुपारी ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान या दुर्घटनेतील मयत विद्यार्थीनी प्रेरणा राहुल गलाटे हिचे वडील राहुल पांडूरंग गलाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी नितीन गंगाधर माने व बस चालक सखाराम बापू तांबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी नितीन माने याला अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची जामीनावर मुक्तता केली.

या घटनेमध्ये आकाश सोमाजी तुपे(22, रूपीनगर पुणे) याला वाचविण्यात यश आले होते. तर प्रेरणा रमेश डोंगरे(21, रा.घरकुल चिखली पुणे), अनिषा नितीन पवळ(19, रा.चिखली ताम्हाण वस्ती), अंकिता राहूल गलाटे(21, कृष्णनगर चिखली), पायल राजू बनसोडे(21 चिखली पुणे) या विद्यार्थीनींचा मृत्यु झाला तर यातील त्यांना वाचविण्यासाठी गेलेला विद्यार्थी रामचंद्र घनश्याम डिचोलकर(22, कणकवली सिंधुदुर्ग) हा बेपत्ता होता.त्याचा शोध घेण्यात आला मात्र शनिवारी रात्रीपर्यंत त्याचा शोध लागला नाही.रविवारी दुसऱिया दिवशी सकाळपासून शोध मोहिमेला सुरूवात करण्यात आली अखेर सायंकाळी ४ वा.सुमारास देवगड स्मशानभुमीनजिक खडकाळ भागात त्याचा मृतदेह सापडला.