खेळत खेळता 10 वर्षांचा मुलगा विहीरीत पडला; वडिलांनी दिले जीवदान

लहान मुले म्हंटल की मस्ती आणि खेळ या नित्यनियमाच्या गोष्टी. मात्र खेळताना किंवा मस्ती करताना अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे आई वडिलांचा जीव टांगणीला लागतो. असाच काहीसा प्रकार देवगड तालुक्यात घडला आहे. विजापुरी कामगारांच्या वस्तीमधील एक 10 वर्षांचा मुलगा 55 फूट खोल विहिरीत पडला. मात्र सुदैवाने या मुलाचे वडील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुलाचे प्राण वाचले आहेत.

सदर घटना देवगड तालुक्यातील जामसंडे हायस्कुलच्या परिसरात घडली आहे. हायस्कुलच्या मागे कामगारांची वस्ती आहे. वस्तीमधील विठ्ठल महादू खरात यांचा मुलगा सुदीप खरात हा आपल्या मित्रांसमवेत घराशेजारील राजू पाटील यांच्या कंपाऊंडमध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास खेळत होता. याच कंपाऊंडमध्ये 55 फुटांची विहीर खोदली असून विहिरीमध्ये 8 फूट पाणी आहे. याच परिसरात खेळत असताना सुदीप हा खेळता खेळता विहिरीत पडला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत घडलेला प्रकार मुलाचे वडील विठ्ठल खरात यांना सांगितला.

वडिलांनी तत्काळ विहिरीच्या दिशेने धाव घेतली. दोरी व आंब्याच्या क्रेटच्या सहाय्याने मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व ग्रामस्थ विहरीच्या आजूबाजूला जमा झाले होते. मुलाला वाचवण्यासाठी विठ्ठल खरात हे दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरले आणि मुलाला आंब्याच्या क्रेटमध्ये बसवून ग्रामस्थांनी वरती खेचले. यावेळी ग्रामस्थ, व्यापारी, विजापुरी कामगार यांनी मुलाला वाचविण्यासाठी विठ्ठल खरात यांना मोलाचे सहकार्य केले. मात्र या सर्व प्रकारात भाऊ विहिरीत पडल्याचे कळताच त्याच्या बहिणीची घाबरून दातखिळी बसली होती. त्यामुळे दोघांनाही तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.