
उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये रविवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या अपघातानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. हा अपघात उत्तराखंडमधील NH 74 वर घडला. अपघातानंतर महामार्ग ठप्प झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी शक्तीफार्मच्या बसगर ग्रामसभेचे सुमारे 60-70 लोक ट्रॅक्टर-ट्रॉलीतून उत्तमनगर येथील गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जात असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, धडकल्यानंतर ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाली. आणि सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

























































