देवरुख सोळजाई देवी लोटांगण यात्रा उत्साहात, हजारो भाविकांच्या साक्षीने 15 भाविकांची लोटांगण घालुन नवसपूर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाद्य वाजंत्रीसह मानकरी, कुमकर, विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोळजाई देवीच्या भाविकांनी देवी मंदिरासमोर लोटांगणे घालून नवसपूर्ती केली. देवरूखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाईची देवदिवाळीची ही लोटांगण यात्रा आज उत्साहात संपन्न झाली.

नवसाला पावणारी देवी अशी श्री देवी सोळजाईची ख्याती आहे. देवदिवाळी दिवशी सकाळी सर्व धार्मिक विधी होऊन दुपारी नवस बोललेले व ते पूर्ण झालेले भाविक यांनी मंदिराभोवती लोटांगण घालून नवस पूर्ण केले. या निमित्ताने मंदिर परिसरात जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले. देवदिवाळी निमित्ताने देवीचे भक्त कानाकोपर्‍यातून मंदिरात दर्शनासाठी आले होते.

या निमित्ताने सोळजाई मंदिर सुशोभित करण्यात आले होते.दिवसभर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रेमुळे विविध प्रकारचे खाद्य विक्रीचे तसेच खेळणी, विविध प्रकारच्या वस्तुंचे स्टॉल लावले होते यातुन चांगली उलाढाल झाली.