
>> प्रशांत गौतम
गेल्या काही काळात मराठवाडय़ाच्या साहित्य विश्वाने लेखक – कवी सुहास बर्दापूरकर, साहित्य क्षेत्रातील हाडाचे कार्यकर्ते श्याम देशपांडे यांच्यासारख्या प्रतिभावंतांच्या अकाली जाण्याने साहित्य विश्व हळहळले होते. आता धनंजय चिंचोलीकर यांच्या अकाली एक्झिटने धक्का बसला आहे. पत्रकारितेत लेखनशैली जपतच धनंजयने साहित्य विश्वात स्वच्छंदी भटकंती केली. त्याने परिश्रमपूर्वक लेखनशैली विकसित केली होती. विशेषतः ग्रामीण विनोदी साहित्यात येणारी ग्रामीण व्यक्तिरेखा, त्यांच्यातील नातेसंबंध यांचे सूक्ष्म लकबीसह चित्रण, बोचरे राजकीय भाष्य असायचे. टोपण नावाने रंगवलेला ‘बब्रुवान रुद्रकंठवार’ तर त्याच्या नावापासूनच इरसाल! जयवंत दळवींच्या ‘ठणठणपाळ’प्रमाणेच हे पात्रही वाचकांच्या कायम लक्षात राहील. धनंजयने आपली स्वतःची साहित्य निर्मिती तर केली; पण ‘बब्रुवान रुद्रकंठवार’ या टोपण नावाने अस्सल व अफलातून साहित्य निर्मिती केली. त्यात आलेली खास टोनमधील मराठवाडी बोलीभाषा ही तर त्याच्या लेखनाचे लखलखीत खास वैशिष्टय़ म्हणता येईल.
मराठी विनोदी साहित्य म्हटले की, कोल्हटकर, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, सुभाष भेंडे, मुकुंद टाकसाळे, आनंद देशपांडे, रवी तांबोळी यांच्या नावांचा उल्लेख केला जातो. या मांदियाळीत धनंजयच्या बब्रुवाननेही स्थान निर्माण केले. मराठी साहित्य विश्वात ‘बालकवी’, ‘केशवसुत’, ‘केशवकुमार’, ‘अनिल’, ‘गोविंदाग्रज’, ‘कुसुमाग्रज’, ‘ठणठणपाळ’ ही टोपण नावे आणि त्यांचे मूळ लेखक आपल्या प्रतिभेने तळपत राहिले. त्यात धनंजयच्या ‘बब्रुवान’चाही समावेश होतो. धनंजयने ‘बब्रुवान रुद्रकंठवार’ नावाने ‘पुन्यांदा चबढब’, ‘बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी’, ‘टीर्यी, डिंग्या आन् गळे’, ‘आम आदमी विदाऊट पार्टी’, ‘चौथ्या इस्टेटच्या बैलाला’, ‘येरी तेरी मगजमारी’ अशी अफलातून साहित्य निर्मिती केली, तर ‘धनंजय चिंचोलीकर’ नावाने ‘अमुक अमुक गल्लीतील दंगल’, ‘न घेतलेल्या मुलाखती’ अशी साहित्य निर्मिती केली, ज्यांना सन्मान, पुरस्कार प्राप्त झाला. विशेष म्हणजे दोनदा महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार तसेच बी. रघुनाथ पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, माहेरचा आहेर पुरस्कारही प्राप्त झाले.
धनंजयचे क्यक्तिमत्त्क म्हणजे गूढ, एखाद्याला प्रथमदर्शनी अबोल, शिष्ट, बोलताना कमालीचा आखूड असा भासायचा. उंच, गोरा कर्ण, कांती, चेहरा मिश्कील आणि त्याच्या नेमाडे स्टाईल झुपकेदार मिश्या ही खास ओळख. भाराभर लेखनाची घाई नाही. प्रसिद्धी, पुरस्काराचा हव्यास नाही. सभा-समारंभात मिरवणे नाही. आपणहून संवाद वाढवणे नाही. ओळख करून घेणे नाही. त्याचे विश्व वेगळे होते. मोजक्याच मित्रपरिवारात तो रमायचा, खुलायचा. सुधीर रसाळ, नरेंद्र चपळगावकर यांच्यासारखे ज्येष्ठ दिग्गज त्याच्यावर पुत्रवत प्रेम करायचे. विनोदाचा कायम आदर करणारा हा अवलिया कायम घराच्या बागेतील फुलझाडांवर व बागेवर प्रेम करणारा होता. कमालीचा संवेदनशील असल्याने तो बाह्य जगात फार रमला नाही. मोजकेच, पण दर्जेदार व अभिजात लेखन (वर्षभरात कमीत कमी दोन-चार लेख), मोजकीच साहित्य निर्मिती ‘लोकपत्र’, ‘देवगिरी’, ‘तरुण भारत’मध्ये असताना बातमीची स्वच्छ, सुवाच्च कॉपी, लेखनशैली, अचूक निरीक्षण, अचूकपणे शब्दांची निवड, कलात्मक हस्ताक्षर असे लेखन-पत्रकारितेत आवश्यक असलेले पैलू जपले व विकसित करून आपली नाममुद्रा ठसठशीत केली.
बुद्धिमत्तेच्या बळावर एक गावरान इंग्रजी अशी संमिश्र भाषा निर्माण केली, ज्याचा फायदा त्याला आपल्या व टोपण नावाच्या लेखनासही झाला. त्यामुळे झालेले लेखन हे अफलातूनच गाजले. या लेखक, पत्रकार मित्राची यापुढे भेट होणार नाही ही कल्पनाच खूप वेदनादायक आहे.




























































