खोया खोया चांद – सरदारी बेगम: दर्जेदार, पण दुर्लक्षित सिनेमा!

>> धनंजय कुलकर्णी

सत्तरच्या दशकामध्ये समांतर चित्रपटाने सातत्याने चांगलेच बाळसे धरले होते. आपली एक वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. मसाला चित्रपटापासून टोटली वेगळा असणारा हा सिनेमा वास्तवदर्शी आणि विचार करायला लावणारा असल्याने एक चांगला प्रेक्षकवर्ग यातून घडला गेला. या आर्ट फिल्मच्या चित्रपंढरीमध्ये अनेक नामवंत चित्रकर्मी सहभागी झाले होते. सशक्त कथानक, भावोत्कट अभिनय आणि पलायनवादापासून दूर असलेले हे कलात्मक सिनेमे आपली चित्रमुद्रा उमटवून जात होते. प्रेक्षकांच्या आवडीला शरण जाण्याचा प्रकार इथे नसायचा. त्यामुळे भलेही या चित्रपटांना मर्यादित व्यावसायिक यश मिळत असलं तरी एका विशिष्ट वर्गाला हे चित्रपट आवडत होते. त्यातूनच चांगला प्रेक्षकवर्ग घडत गेला. ऐंशीच्या दशकात घरातच छोटय़ा पडद्याच्या आगमन झाल्याने या चळवळीला काहीसा ब्रेक लागला, पण तरीही या कॅटेगिरीतील सिनेमे येतच होते. सशक्त कथानकावर आधारित चित्रपट नव्वदच्या दशकातदेखील येत होते. असाच एक चित्रपट जो अभिजात हिंदुस्थानी संगीताच्या गायिकेच्या जीवनावर आधारित होता. दिग्दर्शक शाम बेनेगल यांनी हा चित्रपट अतिशय कलात्मक रीतीने प्रेक्षकांच्या पुढे आणला होता. चित्रपटाचे कथानक काल्पनिक (तसे नमूद केले) असले तरी त्याला थोडीफार वास्तवतेची जोड होतीच. खालिद मोहम्मद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. 23 मे 1996 रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा होता ‘सरदारी बेगम’.

या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट उर्दू भाषेतील चित्रपट म्हणून सन्मानित केले होते. ‘खोया खोया चांद’ या मालिकेत आज आपण याच चित्रपटावर चर्चा करणार आहोत. या चित्रपटाला व्यावसायिक यश फारसे मिळाले नाही, परंतु चित्रपटाचा दर्जा खूपच चांगला होता. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ठुमरी गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या एका तवायफच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारित होती. सिनेमाच्या उत्तरार्धातील कालखंड हा ऐंशीच्या दशकातील दाखवला आहे. दिल्लीतील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या धार्मिक दंगलीमध्ये झालेल्या दगडफेकीत या वृद्ध तवायफ सरदारी बेगमचा (किरण खेर) मृत्यू होतो. तिच्या मृत्यूनंतर राजकारण सुरू होते. एक तरुण पत्रकार मुलगी (रजिना दास बसोरिया) ही बातमी कव्हर करण्यासाठी बाहेर पडते. प्रत्येक राजकीय नेता आपापल्या पद्धतीने या गायिकेच्या मृत्यूबाबत बोलत असतो. शेवटी ती पत्रकार सरदारी बेगमच्या अंत्यसंस्काराला पोहोचते तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसतो. त्या अंत्यसंस्काराला तिचे वडील उपस्थित असतात. कारण ही तवायफ गायिका म्हणजे तिची सख्खी आत्या असते! वडिलांकडून त्या गायिकेचा भूतकाळ समजू लागतो. त्यावर ती एक आर्टिकल तयार करायचे ठरवते आणि सरदारी बेगमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला ती भेटायचे ठरवते. त्यातून सरदारी बेगमचा संपूर्ण जीवनपट तिच्या समोर येतो. फ्लॅशबॅकच्या माध्यमातून चित्रपट पुढे सरकू लागतो.

सरदारी बेगम ही संगीतावर प्रचंड प्रेम करणारी काहीशी हट्टी, परंतु स्वतंत्र विचाराची मुलगी असते. मुस्लिम समाजात तिच्या या स्वतंत्र विचारांचा अर्थातच विरोध केला जातो. ती बंड करून घरातून बाहेर पडते आणि स्वकर्तृत्वाने पुढे जायचे ठरवते. गायकीच्या क्षेत्रात मोठे नाव मिळत असताना तिच्या आयुष्यात अनेक पुरुष येतात. प्रत्येक वेळी ती त्यांचा आधार म्हणून विचार करते, पण हरेक पुरुष तिचे शोषणच करतो. एकटी हतबल सरदारी बेगम संघर्ष करत जीवन जगत राहते. तिच्या जीवनात हेमराज (अमरीश पुरी), साकीब (रजित कपूर), मि. सेन (सलीम घौस) येतात. प्रत्येक वेळी पुरुषाकडे एक आधार म्हणून ती पाहते, पण प्रत्येक वेळी तिची निराशाच होते. यातून ती अधिकाधिक कडवी बनत जाते. आपल्या मुलीला आपल्या संगीताचा वारसा पुढे घेऊन जायला सांगते. मुलीचा अर्थातच त्याला विरोध असतो, पण सरदारी बेगमसाठी आता संगीत हेच सर्वस्व असते. कथानकात वेगवेगळे ट्विस्ट आहेत.

तसं पाहिलं तर हा चित्रपट म्हणजे सरदारी बेगमच्या आयुष्याची शोकांतिका आहे. कालौघात लोकप्रिय सिनेसंगीत आल्यामुळे ठुमरी, दादरा हे अभिजात सांगीतिक कला प्रकार आपोआपच मागे पडत होते. नेमकं सरकारी बेगम हेच समजू शकत नाही. काळासोबत बदलणं हेदेखील गरजेचं असतं, पण तिचं कलेविषयी असणारं वादातीत प्रेम, आस्था आणि त्यातून निर्माण होणारी परिस्थिती यावर दिग्दर्शकाने चांगला प्रकाश टाकला आहे. सरदारी बेगम आपले स्वप्न पूर्ण करू शकते का? तिच्या मुलीचे काय होते? सरदारीचा जीवनपट पाहताना त्या पत्रकार मुलीच्या आयुष्यात काय बदल घडत जातात? हे दिग्दर्शकाने फार प्रभावीपणे पडद्यावर दाखवले आहे. चित्रपट एकाच वेळी अनेक पातळ्यांवरून प्रेक्षकांशी संवाद साधतो. बेगमचे पराकोटीचे संगीतप्रेम, त्यातून आयुष्याची झालेली वाताहत दाखवत असतानाच व्यवहारी जीवनात कला आणि कलाकारांकडे समाजाचा पाहण्याचा उदासीन दृष्टिकोन, राजकारण, महिलांचे शोषण करणारी पुरुषसत्ताक मानसिकता बेनेगल यांनी आपल्या खास शैलीत दाखवली आहे. हा चित्रपट कौटुंबिक नातेसंबंध, जनरेशन गॅप आणि पुरुषकेंद्री राजकारणाच्या शोषण, सत्ता तसेच विकृत सामाजिक तथ्यांवर लक्ष वेधतो. दुर्दैवाने हा चित्रपट चुकीच्या वेळी प्रदर्शित झाला. त्यावेळी हिंदुस्थानात निवडणुकांचे सत्र चालू होते. त्यामुळे चांगला विषय लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही.

या चित्रपटातील पारंपरिक शैलीतील ठुमरी आणि अन्य गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटाचे संगीत अतिशय सुश्राव्य होते. संगीतकार वनराज भाटिया यांनी आशा भोसले, आरती अंकलीकर, शुभा जोशी यांचे स्वर चित्रपटात होते. संगीत अतिशय कर्णमधुर होते. अगदी ‘पाकिजा’ आणि ‘उमराव जान’ची आठवण करून देणारे! या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट उर्दू भाषेतील चित्रपट सन्मानित केले होते. सरदारी बेगमच्या मुलीची भूमिका करणाऱया राजेश्वरी सचदेव हिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तरुण सरदारी बेगमची भूमिका करणारी स्मृती मिश्रा तर पत्रकाराची भूमिका करणारी रजिना दास बसोरिया यांच्या भूमिका अतिशय दर्जेदार झाल्या होत्या. या सिनेमाच्या पोस्टरवर ‘वुमन्स फाईट फॉर आयडेंटिटी’ ही टॅगलाइन होती. मला वाटतं, चित्रपटाचा हाच सारांश होता!
[email protected]
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)