धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत! मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत, उपकार विसरणारे नाहीत, असा माझा आतापर्यंत समज होता; परंतु ते अलीकडे जातीवाद करत आहेत. धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना अचानक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खराब झाली. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधूनच त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. बीड जिल्ह्यातील संवेदनशील राजकीय परिस्थितीवरून त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे हे प्रामाणिक नेते आहेत असे आपल्याला वाटत होते; परंतु ते प्रामाणिक नाहीत, जातीवाद करत आहेत. असा हल्लाबोल जरांगे यांनी केला. धनंजय मुंडे हे सध्या मला मारण्याची भाषा करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

मराठा समाजाने जातीवाद केला नाही

मराठा समाजाने कधीही जातीवाद केला नाही. उलट सर्व जातीधर्मांना सोबत घेऊनच मराठा समाजाने काम केले आहे. परंतु सध्या मात्र मराठा समाजावर अन्याय होत असून, त्याचा रोष समाजातील तरुणांमध्ये असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. मराठा तरुणांनी त्यांना कोण त्रास देत आहे याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी मंडळी कारस्थाने रचत असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधानांना भीती वाटते

आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने मराठा समाजाची ताकद सगळ्यांनाच कळली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या वार्‍या करत आहेत. केवळ सत्ता मिळेपर्यंत मोदींना गोरगरीब लागतात. त्यानंतर ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपला लढा चालूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला. याच माध्यमातून मराठा समाजाबरोबरच दलित, मुस्लिम समाज एकवटत आहे. या एकवटलेल्या समाजाला मी सत्तेत आणेल, अशी भीती पंतप्रधानांसह भाजपा नेत्यांना वाटते, असेही ते म्हणाले.