
महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच धामधूम सुरू असून हिवाळ्यातही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नुकतीच महानगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. सत्ताधारी तीन पक्षांमध्ये जागांच्या वाटाघाटीवरून रस्सीखेंच सुरू आहे. त्यातच कोर्टाच्या दणक्यानंतर अजित पवार गटाच्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेणात आला आहे. पार्थ पवार यांचे कथितरित्या जमीन घोटाळ्यात येणारे नाव यामुळे अजित पवार अडचणीत आहेत. तर बुधवारी अजित पवार गटातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गटात कुणालाही न सांगता दिल्ली गाठत थेट केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर चर्चांना उधाण आलं. विविध तर्कवितर्क करण्यात आले. आता या भेटीत नक्की काय घडलं ते समोर आलं आहे.
धनंजय मुंडे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मागणी केली. परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राचा केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ (PRASHAD) योजनेत समावेश करावा, अशी विनंती मुंडे यांनी या भेटीदरम्यान केली.
परळी आणि बीड जिल्ह्याचा होणार कायाकल्प या भेटीबाबत माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘प्रसाद योजनेच्या माध्यमातून प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास आणि कायाकल्प झाल्यास, परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत आणि पर्यटनात सकारात्मक बदल घडतील. हे ज्योतिर्लिंग देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असल्याने, केंद्राच्या मदतीने येथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचा मुंडे यांचा मानस आहे.’
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प… pic.twitter.com/xr5IqIskwo
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 17, 2025
धनंजय मुंडे यांनी X पोस्ट वरून याची माहिती दिली आहे. ‘आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे; त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती’, असे त्यांनी पोस्ट मध्ये स्पष्ट म्हटले आहे.



























































