आरक्षणप्रश्नी खंडाळ्यात धनगर समाजबांधव रस्त्यावर, पुणे-बंगळूरु महामार्गावर पाच तास ‘रास्ता रोको’

धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गात आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आज खंडाळ्यात मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरलेल्या धनगर बांधवांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग तब्बल पाच तास रोखून धरला. त्यामुळे पुणे आणि सातारा बाजूकडे जवळपास पंधरा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. दुपारी एक वाजता बंद झालेला महामार्ग सायंकाळी सहा वाजता सुरू झाला, तेव्हा वाहनधारकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

धनगर आरक्षणासाठी समाजाच्या वतीने महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे आज खंडाळा येथे रास्ता रोको करण्यात आला. तत्पूर्वी याप्रश्नी लोणंद येथे उपोषणास बसलेल्या गणेश केसकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजातर्फे खंडाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महामार्गापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या जनसमुदायाने दुपारी एकच्या सुमारास महामार्गावर शेळ्या-मेंढय़ा सोडून महामार्ग अडविला. महामार्ग बंद करण्यात आल्याने सातारा व पुणे अशा दोन्ही बाजूला जवळपास पंधरा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

या आंदोलनात हजारो धनगर बांधव, महिला, युवक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणाही देण्यात आल्या. आंदोलन शांततेने सुरू होते; परंतु काही आंदोलनकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे तसेच वाहनधारकांना होत असलेल्या त्रासामुळे बऱयाच ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग उद्भवले. अखेर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर गणेश केसकर यांनी मोबाईलवर आंदोलनकर्त्यांची समजूत काढत रास्ता रोको स्थगित करण्यात आले. तरीही काही अतिउत्साही आंदोलक काही केल्या महामार्गावरून उठत नव्हते. अखेर दुपारी एक वाजता बंद झालेला महामार्ग सायंकाळी सहा वाजता चालू झाला तेव्हा वाहनधारकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

धनगर आरक्षणासाठी गणेश केसकर यांच्या उपोषणाच्या तेराव्या दिवशी शासनाचा तेरावा घालण्यात आला. यानंतरही शासन लक्ष देत नसल्याने आज पुणे-बंगळुरू महामार्ग बंद करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

वाहनांच्या पंधरा किलोमीटर लांब रांगा

धनगर बांधवांनी खंडाळ्यामध्ये पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरल्यामुळे सातारा, कोल्हापूर, सांगली, बंगळुरू तसेच पुणे-मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक सुमारे पाच तासांहून अधिक काळ ठप्प झाली. त्यामुळे पुणे आणि सातारा या दोन्ही बाजूला वाहनांच्या तब्बल पंधरा किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठय़ा अडचणीचा सामना करावा लागला. दरम्यान, अनेकांनी भोर-मांढरदेव-वाईमार्गे सातारा हा मार्ग अवलंबला.