धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांचा हल्ला

अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाजाने काढलेल्या महामोर्चाला हिंसक वळण लागले. जिल्हाधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारण्यास उशीर लावल्याने संतापलेल्या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच हल्ला चढवला. आंदोलकांनी तुफान दगडफेक करून अधिकार्‍यांच्या गाड्यांची तोडफोड केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी जालना येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 1 वाजता गांधी चमन येथून हा मोर्चा निघाला. तासाभरात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. समाजातील मान्यवरांची भाषणे सुरू झाली. धनगर समाजाचा मोर्चा आल्याचे जिल्हाधिकार्‍यांना कळवण्यात आले. तासभर उलटूनही प्रशासनाच्या वतीने कोणीही निवेदन स्वीकारण्यास आले नाही.

जिल्हाधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारण्याचा आग्रह
तासभर उलटूनही निवेदन घेण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी येत नसल्याने मोर्चेकर्‍यांच्या संतापाचा कडेलोट झाला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ हे निवेदन घेण्यासाठी येत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका मोर्चेकर्‍यांनी घेतली. अखेर जिल्हाधिकार्‍यांनी निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके आणि उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ यांना मोर्चेकर्‍यांचे निवेदन घेण्यासाठी पाठवले. तोपर्यंत मोर्चेकरी प्रवेशद्वार तोडून आत घुसले.

दगडफेक, कुंड्या फेकल्या
प्रवेशद्वार तोडून आत घुसलेल्या मोर्चेकर्‍यांनी तुफान दगडफेक सुरू केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच अफरातफर उडाली. दगडफेकीत कार्यालयाच्या काचा फुटल्या. मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची गाडी फोडली. त्यानंतर आवारात उभ्या असलेल्या दुचाकींसह इतर अधिकार्‍यांच्या गाड्याही फोडण्यात आल्या. मोर्चाला हिंसक वळण लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

तोकडा पोलीस बंदोबस्त
धनगर समाजाचा मोर्चा धडकणार असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र हा बंदोबस्त अतिशय तोकडा होता. त्यामुळे अतिरिक्त फौजफाटा येईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक वाहनांची तोडफोड झाली होती. मुळात वातावरण संवेदनशील असल्यामुळे जास्तीचा बंदोबस्त का ठेवण्यात आला नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

खोटे गुन्हे दाखल करू नका
जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी मोर्चेकरी तासभर ताटकळले. त्यामुळे संताप अनावर झाला आणि तोडफोड झाली. तोडफोडीचे समर्थन कोणीही करणार नाही. परंतु प्रशासकीय अधिकार्‍यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखायला पाहिजे. आम्हाला शांततेच्या मार्गानेच आरक्षण मिळवायचे आहे. प्रशासनाला विनंती आहे की, त्यांनी मोर्चेकर्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करू नयेत, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.