
धारावीतील रस्ते विकासाच्या कामासाठी तब्बल 210 झाडे बाधित होणार आहेत. यामध्ये 67 झाडे तोडण्यात येणार असून 143 झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आज मंजूर केला. विशेष म्हणजे, या बाधित झाडांमध्ये तीन वारसावृक्षांचाही समावेश आहे. धारावीतील रस्त्यांच्या विकासासाठी मुंबईतील झाडांवर कुऱ्हाड चालणार असताना त्याच्या बदल्यात हजारो झाडांची लागवड मात्र मुंबईबाहेर पालघर जिल्ह्यात केली जाणार आहे. विरोधानंतरही या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
या प्रस्तावानुसार तोडण्यात येणाऱया झाडांच्या बदल्यात 3 हजार 78 नवीन झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पालघर जिह्यातील पोचाडे आणि तामसई या दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे 18 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड केली जाणार आहे.
या प्रकल्पांमध्ये वृक्ष कत्तल
जी/उत्तर विभागातील 20 मीटर रुंद रस्ता धारावीतील शहर सर्वेक्षण क्रमांक 2, 4 आणि 62 अंतर्गत इमारतींच्या पुनर्बांधणीसह प्रस्तावित 20 मीटर रुंद रस्त्याच्या कामामुळे एकूण 75 झाडे बाधित होणार आहेत. या परिसरातील एकूण 334 झाडांपैकी 259 झाडे कायम ठेवण्यात येणार आहेत.
आरपीएफ ग्राऊंड रेल्वे कॉलनी परिसरातील वाहनमार्ग
धारावीतील आरपीएफ ग्राऊंड रेल्वे कॉलनी परिसरात रेल्वेच्या परिचालन सुविधांच्या विकासासाठी प्रस्तावित वाहनमार्गामुळे 135 झाडे बाधित होणार आहेत. यापैकी 53 झाडे तोडली जाणार असून 82 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या परिसरातील एकूण 393 झाडांपैकी उर्वरित 258 झाडे सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.




























































