धारावीत ‘सुरक्षा’बंधन! राख्या बनू लागल्या, चर्मोद्योगही सुरू

509

>> देवेंद्र भगत

लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प पडलेले धारावीतील छोटे-मोठे उद्योग आता हळूहळू सुरू होऊ लागल्याने उद्योगाची गाडी रुळांवर येऊ लागली आहे. यामध्ये रक्षाबंधन काही दिवसांवर आल्यामुळे राख्या बनवण्याचे काम सुरू झाले असून चर्मोद्योग, मच्छीविक्री, मातीच्या भांडय़ांची विक्री आदी छोटे व्यवसाय सुरू झाले आहेत. एका वेळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आता कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आल्यामुळे ही स्थिती संपूर्ण मुंबईसाठी शुभसंकेत मानला जात आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या आणि पालिकेच्या जी-उत्तर विभागात येणाऱया धारावीत अडीच चौरस किमी जागेत साडेआठ लाख लोकसंख्या दाटीवाटीने वसलेली आहे. या ठिकाणी चर्मोद्योग, कॅटरिंग व्यवसाय, खाद्यपदार्थ बनवणे, राख्या बनवणे, कापड उद्योग, कुंभारकाम, रिसायकलिंग असे अनेक प्रकारचे लघुउद्योग चालतात. कोटय़वधीची उलाढाल असणाऱया या लघुउद्योगात लाखो लोक काम करतात. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये या ठिकाणी काम करणारे हजारो कामगार आपल्या मूळ गावी परतल्याने आणि कच्चा माल मिळणे बंद झाल्याने उद्योग ठप्प होते. मात्र आता या ठिकाणचे अनेक उद्योग सुरू होत आहेत. कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे 70 टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले असून कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आल्याची माहिती जी-उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला आमचा व्यवसाय थोडय़ा प्रमाणात सुरू झाला आहे. पाकीट, बेल्ट, पर्स आदी वस्तू आमच्याकडे बनवल्या जातात. मात्र कोरोनामुळे गावी गेलेले कामगार अजून परतलेले नाहीत. याचा परिणाम होत आहे. – चंद्रकांत भोईटे, साई लेदर वर्क

आमचा छोटा व्यवसाय लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे आता सुरू झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या गिऱहाईक कमी असल्याने 25 टक्केच व्यवसाय होत आहे. त्यामुळे पूर्ण कोरोनाचे संकट जाऊन पूर्णपणे व्यवसाय सुरू व्हायला हवा.
– श्रुतिका सोनकोळी, मच्छी व्यावसायिक

धारावीत पालिकेने लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने केलेल्या कामामुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे आता चर्मेद्योग, इमिटेशन ज्वेलरी, कुंभारकाम असे उद्योग सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. धारावी लवकरच कोरोनामुक्त होईल.
– वसंत नकाशे, स्थानिक नगरसेवक

आमचा राखी बनवण्याचा व्यवसाय वर्षभर सुरू असतो. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कच्चा माल येत नसल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मात्र आता लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे व्यवसाय सुरू झाला आहे. लवकरच कोरोनाचे संकट टळेल असा विश्वास आहे.
– मुलचंद पटवा, कृष्णा राखी आर्ट

आपली प्रतिक्रिया द्या