
धाराशीव जिह्यात पाहणी दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जमाफीबाबत शेतकऱ्याने प्रश्न विचारताच त्याच्यावर संतापले आणि त्यांचा तोल गेला. आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलो का, असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्याला झापले.
अजित पवार परंडा तालुक्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी एका तरुण शेतकऱ्याने कर्जमाफीची मागणी केली. त्यावर ‘याला द्या रे मुख्यमंत्रीपद. सकाळी सहाला सुरुवात केलीय मी… आम्हालाही कळतं. लाडक्या बहिणींना वर्षाला 45 हजार कोटी देतोय. अरे बाबा, सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही.’ असे सांगत अजित पवार यांनी या शेतकऱ्याची मागणी धुडकावली.
View this post on Instagram
राजकारण कशाला करता! मुख्यमंत्री शेतकऱ्यावर चिडले
औसा तालुक्यातील उजनी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही एका शेतकऱ्यावर चिडले. ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी द्या, अशी या शेतकऱ्याची मागणी होती. मात्र, ‘ये दादा गप्प बस, राजकारण करू नकोस’ असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, आम्ही राजकारणी नाही, शेतकरी आहोत. तुम्हाला प्रश्न विचारणं चूक आहे का, असा सवाल या शेतकऱ्याने केला.