
अॅसिडिटी (Acidity) होणे म्हणजे पित्त हा आजार तसा सामान्य आहे. दैनंदिन जीवनात चुकीचा आहार घेतल्याने, अनियमित व्यायाम किंवा अपुरी झोप आदी कारणांमुळे पित्त किंवा अॅसिडिटीचा त्रास होतो. भूक नसताना जेवणे, मसालेदार अन्नपदार्थांचे सेवन, चहा किंवा कॉफीचे अतिसेवन आणि रात्री उशीरा जेवणे तसेच जेवल्यानंतर लगेच झोपणे अशा वाईट सवयी अॅसिडिटीला कारणीभूत ठरतात. यासाठी आहाराचे पथ्य पाळणे, आहाराच्या योग्य सवयी लावून घेणे आवश्यक असते. अँटीबायोटिक्स, लोह (Iron) इत्यादी अशा काही औषधांमुळे छातीत जळजळ होते.
अॅसिडिटी आणि ह्रदय विकाराची लक्षणे जवळपास सारखीच असतात. ही लक्षणे न टाळण्याजोगी असतात. त्यामुळे यातील फरक ओळखणे फार कठीण होते. अॅसिडीटीमध्ये छातीत जळजळ जाणवते. विशेषत, पोटाच्या वरच्या भागात ही जळजळ जास्त प्रमाणात होते. अॅसिडिटीमुळे तोंडात आंबट आणि कडू चव येते. काही वेळेस उलटय़ाही होतात. हृदयविकाराच्या झटक्यात छातीत दुखते. या वेदना छातीपासून मान, जबडा आणि पाठीपर्यंत पसरतात. पोटात दुखणे, धाप लागणे, घाम येणे आणि चक्कर येणे अशी लक्षणे असून हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने हा त्रास होतो.
जेव्हा जेव्हा रुग्णाला वरील लक्षणे दिसतात तेव्हा ईसीजी आणि कार्डियाक तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. जर पहिला ईसीजी सामान्य असेल तर 10 मिनिटांनंतर पुन्हा ईसीजी करावा. जेव्हा बारा तासांचा ईसीजी सामान्य असतो आणि एंजाइम वाढलेले नाहीत तेव्हाच हृदयविकाराचा झटका नाही असे स्पष्ट होते.
अॅसिडिटी आणि हृदयविकाराचा झटका यांच्या लक्षणांमध्ये साम्य असले तरी वेळीच तज्ञांचा सल्ला घेणे, औषधोपचार करणे तसेच लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. घाम येणे, छातीत धडधडणे, ही दोन हृदयविकाराची प्रमुख लक्षणे आहेत. या लक्षणांना अॅसिडिटी किंवा गॅसचा दाब समजून दुर्लक्ष करु नका. अनेकदा पोटातला गॅसचा दबाव वाढून तो छातीवर आल्यासारखे वाटते. पण छातीतले हे दुखणे अगदी थोडावेळ राहते आणि कमी होते. काही व्यक्तींमध्ये, पोटातली अॅसिडीटी वाढून ती अन्ननलिकेत जाण्यामुळे छातीत दुखते. पण त्यात दुखण्यापेक्षा छातीत जळजळ होण्याची भावना जास्त असते. त्यामुळे छातीत दुखत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष द्या आणि तज्ञांचा सल्ला घ्या.
डॉ. कौशल छत्रपती, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट