
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चिट देण्यावरून निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. या लेटरबॉम्बमुळे आयोगातील वादाची जोरदार चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणूक प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. परस्परांविरुद्ध आचारसंहिता भंगच्या तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधातही तक्रारी दाखल झाल्या होत्या. पंतप्रधान मोदींविरुद्ध दाखल झालेल्या 11 तक्रारींमध्ये त्यांना क्लीन चिट देण्यात आली. या क्लीन चिटला अशोक लवासा यांचा आक्षेप होता असे वृत्त आहे.
निवडणूक आयोग हे पंतप्रधान मोदींच्या हातातील खेळणे झाले असल्याचे अशोक लवासा यांच्या पत्रावरून स्पष्ट होते अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. हे गंभीर प्रकरण असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे सुरजेवाला म्हणाले.
तिन्ही आयुक्त एकमेकांचे क्लोन नसतात, मतमतांतरे असू शकतात – अरोरा
या वादासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आपली भूमिका मांडली. आयोगात तीन आयुक्त असतात आणि तिघेही एकमेकांचे क्लोन नसतात. वेगळे मत असू शकते, मतमतांतरे असू शकतात. भूतकाळातही अशी मतमतांतरे समोर आली होती असे अरोरा म्हणाले. जोवर तुम्ही आयोगात आहात तोवर तुमचे मत सार्वजनिक मांडणे अयोग्य आहे. निवृत्तीनंतर पुस्तक लिहून मांडू शकता. सर्व मुद्दय़ांवर चर्चा करण्याची माझी तयारी आहे, मात्र प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते असे अरोरा यांनी सांगितले.
लवासा यांचे काय आहेत आक्षेप…
आचारसंहिता भंगच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा या तिघांची समिती निर्णय घेते, मात्र या समितीने बहुमताच्या आधारे निर्णय घेतले, माझे आक्षेप नोंदविले नाहीत असे लवासा यांचे म्हणणे आहे. लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांना 4 मे रोजी पत्र पाठविले. त्यानंतर एकूण तीन वेळा त्यांनी पत्र दिल्याचे वृत्त आहे. अरोरा आणि चंद्रा यांच्या मतांशी लवासा असहमत होते. क्लीन चिट देण्याबाबतचा निर्णय बहुमताने घेतला तरी अल्पमताचाही उल्लेख आदेशात केला पाहिजे असे लवासा यांनी पत्रात म्हटले आहे. लवासा यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला आहे. निर्णयामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक न्यायमूर्तींच्या मताचा उल्लेख असतो तसाच उल्लेख आयोगाच्या निर्णयात करायला हवा. तीनपैकी जर एका आयुक्तांचे मत इतर दोघांपेक्षा वेगळे असेल तर त्याचीही नोंद केली पाहिजे असे लवासा यांचे म्हणणे आहे.


























































