गोवा – राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: दिगंबर कामत

चांदर – गिरदोली येथे मंगळवारी सकाळी एका 18 वर्षीय युवतीला वाटेत अडवुन जंतु नाशक पाजण्याच्या घटनेने राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे परत एकदा उघड झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्वरीत या घटनेकडे लक्ष देवुन आरोपींना अटक करावी व असल्या घटना परत घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार व खुनाच्या घटनेच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या असतानाच तसेच गोव्यात शिरदोन येथे किनाऱ्यावर सापडलेल्या बालिकेची ओळख पटविणे व तिच्या मृत्युचे कारण शोधण्यास तपास यंत्रणेला अपयश आलेले असतानाच, गिरदोलीच्या कालच्या घटनेने भाजपशासीत राज्यात महिलांच्या सुरक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे असे कामत यांनी म्हटले आहे.

देशातील कोसळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व व्यवसाय बंद पडले आहेत. सरकार तरुणांना रोजगार उपलब्द करुन देण्यास अपयशी ठरल्याने युवा वर्ग गुन्हेगारीकडे वळेल असा इशारा देत सरकारने यावर उपाय काढणे गरजेचे असल्याचे काँग्रेस पक्षाने सरकारच्या निदर्शनास आणले होते. परंतु, सरकारने आमच्या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याने आज सर्वत्र गुन्हे वाढत आहेत असा आरोप कामत यांनी केला आहे.

गिरदोली- चांदर येथील घटनेचा पोलिसांनी जलद गतीने तपास करावा व त्यात सामील झालेल्या सर्वांना अटक करुन कडक शिक्षा द्यावी तसेच सदर तरुणी व तिच्या कुटूंबियांना योग्य सुरक्षा पुरवावी अशी मागणी कामत यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या