डीजिटल इंडियाला ठगांचा चुना! सहा वर्षांत पाच पटीने वाढले सायबर गुन्हे

digital-india-crime

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजतगाजत डीजिटल इंडिया सुरू केलं खरं पण याच डीजिटल इंडियाची सुरक्षितता मात्र वाऱ्यावर सोडल्याचं समोर आलं आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगती करताना त्यात सुरक्षेचा मुद्दा फारसा गंभीरतेने न घेतल्याने डीजिटल सुरक्षेअभावी गेल्या सहा वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये पाचपटीने वाढ झाली आहे.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, 2012-13मध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या 8 हजार 765 इतकी होती तर 2018मध्ये ती वाढून 34 हजार 792वर गेली आहे. या गुन्ह्यांतील रकमेचा आकडा 2012-13मध्ये 67 कोटी 65 लाख इतका होता तो आकडा 2018मध्ये तब्बल 207 कोटी 41 लाख रुपये इतका झाला आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये ही संख्या तब्बल पाचपटीने वाढल्याचं निष्पन्न झालं आहे. या गुन्ह्यांमध्ये एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सर्वाधिक जास्त गुन्हे घडले आहेत.

भोपाळ येथील रहिवासी असलेल्या डॉ. प्रकाश अग्रवाल यांच्या माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना ही आकडेवारी रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे.  या आकडेवारीतूनही काही धक्कादायक गोष्टीही समोर आल्या आहेत. अशा प्रकारच्या डीजिटल फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे कोणतेही प्रावधान अथवा निर्देश रिझर्व्ह बँकेने दिलेले नाहीत. तसंच ज्या बँकांनी आपल्या ग्राहकांना एटीएम कार्डांचं वाटप केलं आहे, त्यापैकी किती ग्राहक साक्षर किंवा निरक्षर आहेत, याची कोणतीही आकडेवारी संबंधित बँकांकडे उपलब्ध नाही, असंही या अर्जाच्या उत्तरात नमूद करण्यात आलं आहे.