
मुंबईतील वांद्रे येथील हॅपी बुक स्टॉल हा पुस्तकप्रेमींना चांगल्या रितीने माहिती आहे. 1947 सालापासून आजतागायत हा स्टॉल अव्याहतपणे सुरू आहे. इथे येऊन, पुस्तकं पाहून ती विकत घेणाऱ्यांची संख्या ही बरीच आहे. कोरोना काळात इथे पुस्तक खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. कोरोनासाठी घालण्यात आलेले निर्बंध उठल्यानंतर इथे येणाऱ्या ग्राहकांनी युपीआय किंवा इतर डिजिटल पेमेंटची विचारणा करण्यास सुरुवात केली. रोखीने पैसे देणाऱ्यांची संख्या नगण्य झाल्याने हा बुक स्टॉल चालवणाऱ्या राजन आणि कृतार्थ जेराजानी या पितापुत्रांना अडचण येत होती. एमस्वाईप या कंपनीच्या PoS मशिनने त्यांची ही अडचण दूर केली. या मशिनमुळे डेबिट, क्रेडी कार्ड किंवा युपीआयद्वारे पुस्तकाचे पैसे ग्राहकांना देता येऊ लागले. डिजिटल माध्यमातून पैसे भरणा करता येऊ लागल्याने ग्राहकांचीही सोय झालीय आणि हॅपी बुक स्टॉलच्या मालकांचीही.
































































