वेब न्यूज : अनोखे डिजिटल पेन

162

सामना ऑनलाईन । मुंबई

शास्त्रज्ञांनी नुकत्याच एका भन्नाट डिजिटल पेनाचा शोध लावला आहे. हे पेन नेहमीच्या लिखाणाला डिजिटल लिखाणात परिवर्तित करते. कागदावर नेहमी लिहिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेनासारखेच हे पेन आहे, मात्र या डिजिटल पेनात एक ऑप्टिकल रीडर असून हा रीडर आकृत्या, नकाशे, लिखाण हे सगळे संग्रहित करते आणि त्यानंतर हा रेकॉर्ड केलेला डाटा वायरलेस ट्रान्समीटरच्या मदतीने नंतर संगणकावरती हस्तांतर केला जातो. या पेनचे एक अनोखे वैशिष्टय़ म्हणजे हाताने लिहिलेल्या नोटसी ज्या डिजिटल स्वरूपात साठवलेल्या असतात त्या सहजपणे एडिट तर करता येतातच, पण टेक्स्ट फॉन्टच्यात देखील रूपांतरित करून ईमेल आणि वर्डमध्ये सहजपणे वापरता येतात. सध्याचा आधुनिक काळ हा तसा टच स्क्रीनच्या लॅपटॉप, टॅबलेटस् आणि मोबाईलचा असला, तरीदेखील कागदाचा वापर हा वाढताच राहिला आहे. आजही 80 टक्के प्रोफेशनल्स हे आपल्या लिखाण, नकाशे अशा विविध कामांसाठी कागदाचाच वापर करतात. स्वीडिश उद्योजक आणि संशोधक Christer Frahraues यांनी या डिजिटल पेनाच्या तंत्रज्ञानाचा प्रथम शोध लावला. Christer Frahraues हे स्वतः एक फिजिशियन असून त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन डिएगो येथून बायोइंजिनीअरिंमध्ये M.Sc.ची डिग्री मिळवलेली आहे. तर स्वीडनच्याच लंद युनिव्हर्सिटीमधून तंत्रज्ञान शाखेची मानद डॉक्टरेट प्राप्त केली आहे. सध्या अनेक कंपन्या या तंत्रज्ञानासाठी उत्सुक असून या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा परवाना अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना देण्यात येतो आहे. डेटा /सिग्नेचर कॅप्चर, फॉर्म फिलिंग, मॅपिंग, सर्वेक्षण, दस्तऐवज व्यवस्थापन, पेपर रीप्ले, व्हाईटबोर्ड, खेळणी आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत या नव्या डिजिटल पेनाच्या तंत्रज्ञानाने बरेच नवे नवे बदल घडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काळात या तंत्रज्ञानाची अधिक प्रगती होऊन त्याच्यापासून ग्राफिक्स डिझायनिंग, चित्रकला अशा क्षेत्रातही बरेच काही नवे बदल घडणे शक्य होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या