
सध्या सगळ्या मुलांच्या शाळा कॉम्प्युटरवर घरी भरताहेत. काही मुलांना ही डिजिटल शाळा जमलीए तर बऱयाच ग्रामीण भागांतून ही पद्धती पेलणं अवघड जाते आहे… मुलांचा अभ्यास ही स्वखुशीने स्वीकारलेली पालकांची जबाबदारी असते. काय आहे याबाबत पालकांचे मत…??
कोरोना लॉकडाऊनचा काळ सुरू असल्यामुळे आपल्या घरीच डिजिटल शाळा भरत आहे. ज्यांच्या घरी शाळेत जाणारी मुलं मुली आहेत ते या दिवसांत मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपद्वारे शिकत आहेत. विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली नाही तरी शिक्षण सुरू राहायला हवे हा यामागचा उद्देश. शिवाय मुलांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे या दृष्टीने सुरू झालेली ही पहिली ऑनलाइन शाळा पालकांना कशी वाटते, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
नवा शिक्षण पर्याय सोयीचा…पण!
ऑनलाइन शाळेचा पर्याय मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचा आहे. ऑनलाइन व्हिडीयो कॉलद्वारे शिक्षक मुलांना शिकवतात. व्हॉट्सऍपद्वारे शैक्षणिक साहित्य म्हणजे व्हिडीयो, वर्कशिट मुलांना पाठवले जातात. माझी मुलगी 8वीमध्ये शिकते. तिला दररोज चार विषय झॅम व्हिडीयो कॉलद्वारे शिकवले जातात. मात्र या प्रक्रियेमुळे काही मुद्दे माझ्या लक्षात आले. ते म्हणजे ऑनलाइन शाळेसाठी शिक्षक आणि मुले ट्रेन नाहीत. बऱयाच मुलांच्या घरी डिजिटल सोयीसुविधा नाहीत. काही वेळा शिक्षकांकडे नेटवर्कची अडचण दिसून येते. शिकवलेलं मुलांना समजलंय की नाही हे तपासून पाहिलं जात नाही. अर्धावेळ कमी नेटवर्कमुळे शिक्षकांचा आवाज मुलांपर्यंत पोहोचत नाही. वेळेअभावी शंकानिरसन करण्याची संधी मिळत नाही. गृहपाठ वह्या तपासल्या जात नाहीत. या कमतरतांचा विचार करून या ऑनलाइन प्रक्रियेत बदल करण्याची गरज आहे, असे वाटते.
ऑनलाइन परीक्षेच्या काळात शाळेकडे झूम ऍपचे लायसन्स नसल्यामुळे 45 मिनिटांचा फ्री कॉल ठेवला जातो. 25 मार्कांचा सविस्तर पेपर 40 मिनिटांत सोडवणे मुलांना खूप कठीण जाते. भरभर लिहिण्याचा ताण येतो. वेळेत पेपर सोडवून होत नाही. – भूपेंद्र मौजे, पालक
पालकांची बाजूही समजून घ्या!
माझी छोटी मुलगी इयत्ता पहिलीत शिकते. सध्या ऑनलाइन शाळा सुरू झालीय. यामध्ये शाळेकडूनच व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला आहे. त्याच ग्रुपद्वारे दररोज वर्कशीट्स येते. म्हणजे एक व्हिडीयो बघून वर्कशीट सोडवायला सांगतात. यासोबत शाळेची पुस्तके, वर्कबुक्स यांचाही अभ्यास असतो. त्यातील अभ्यास कसा करायचा याची माहितीही व्हिडीयोद्वारे सांगितली जाते. मी माझ्या मुलीबरोबर हा शाळेचा अभ्यास करायला बसते. बऱयाचदा कसं होतं यामुळे मुलं व्यस्त झाली आहेत, पण त्यांना व्हिडीयो बघायला आवडत नाही. शिक्षक एखादी कविता शिकवत असतील तर मन लावून ऐकते पण धडा शिकवत असतील तर ऐकायला कंटाळा करते.
या प्रक्रियेमध्ये पालकांना स्वतःचा स्वतंत्र वेळ द्यावा लागतो. हल्ली काही पालकही त्यांचे वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसेच जास्त मुलं असतील तर त्यांना समजावून सांगणे, अभ्यास करवून घेणे यासाठी कोणी नाही. मला एक मुलगी असल्यामुळे तिच्यासोबत बसून अभ्यास करवून घेते. तसेच शिकवलेला धडा दोन ते तीन वेळा समजून घ्यायला हवा. व्हॉट्सऍपच्या माध्यमातून दोन तीन मिनिटांच्या व्हिडीयोतून हे शक्य होत नाही. धडा व्यवस्थित शिकवण्याऐवजी त्यांना प्रश्नोत्तरे सोडवायला दिली जातात. शब्द त्यांचे अर्थ सांगितले जातात आणि सांगतात, तुम्ही आता याचा अभ्यास करा. पण मुलांना धडाच माहिती नाही, तर प्रश्नोत्तरे कशी सोडवणार? शब्दांचे अर्थ कसे समजणार? या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच काही पालकांनाही ऑनलाइन पद्धतीने या सगळ्या वस्तू कशा हाताळायच्या याचे ज्ञान नाही. असे पालक मुलांना ऑनलाइन शिक्षणास मदत करायला कमी पडतात, याचाही विचार व्हायला हवा. – मनिता शर्मा, पालक


























































