गो डिजिटल! रोखीपेक्षा कॅशलेस व्यवहारांना पसंती

देशात डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांना आता रोखीपेक्षा डिजिटल पेमेंटचा पर्याय सोपा वाटतोय. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात नोव्हेंबर महिन्यात यूपीआय आणि भीम अॅपद्वारे 221 कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाले असून त्याद्वारे 390 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत ही वाढ तब्बल 106 टक्क्यांहून अधिक आहे. गतवर्षी याच कालावधीत 122 कोटी युपीआय व्यवहारांतून 189 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.

लॉकडाऊनच्या कालावधीत सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी किरकोळ व्यावसायिकांनी व्यवहारासाठी डिजिटल पेमेंटची पद्धत निवडली. तसेच ग्राहकांकडूनही ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढले. याचा परिणाम म्हणजे मार्च ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत यूपीआय पेमेंटमध्ये 90 टक्के वाढ झाल्याचे एनपीसीआयने म्हटले आहे. एप्रिल महिन्यात डिजिटल पेमेंटमध्ये मोठी घट झाली होती. सणासुदीच्या काळात म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अनुक्रमे 386 कोटी आणि 390 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमधील वाढ जवळपास 7 टक्के आहे.

1 जानेवारीपासून मोठा बदल

थर्ड पार्टी पेमेंट अॅपची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी एनपीसीआयने 1 जानेवारी 2021 पासून थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडरद्वारे संचालित यूपीआय पेमेंट सेवेवर 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुगल पे, अॅमेझॉन, फोन पेसारख्या कंपन्यांना यूपीआय अंतर्गत जास्तीत जास्त 30 टक्के व्यवहार करता येतील.

– देशात डिजिटल व्यवहारांत उत्तरोत्तर वाढ होणार असून 2023 पर्यंत 66.6 अब्ज ट्रान्सझेक्शन रोखीतून डिजिटलमध्ये परावर्तित होऊन 271 अब्ज डॉलरचे व्यवहार होतील. 2030 पर्यंत हा आकडा 856 अब्ज डॉलरपर्यंत जाईल,असे एक्सेंजर या कंपनीच्या अहवालात म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या