
‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेले निर्माता/दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी भोपाळमधील रहिवाशांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.
विवेक अग्निहोत्री यांचे वादग्रस्त विधान
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या विवेक अग्निहोत्रीच्या वक्तव्यात ते म्हणतात- मी भोपाळमध्ये मोठा झालो आहे पण मी भोपाळी नाही. कारण भोपाळीचा एक वेगळाच अर्थ आहे. मी तुम्हाला कधीतरी खासगीत समजावून सांगेन. एका भोपाळीला विचारा. भोपाली म्हणजे तो समलैंगिक आहे, नवाबी हा छंद आहे’.
दिग्विजय सिंह यांचा विवेक अग्निहोत्रींवर पलटवार
विवेक अग्निहोत्री यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह संतापले आहेत. दिग्विजय सिंह यांनी विवेकवर निशाणा साधत ट्विट केले आहे. दिग्विजय सिंह यांनी लिहिले – विवेक अग्निहोत्री जी, हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. तो सामान्य भोपाळ रहिवाशाचा नाही. मी 77 पासून भोपाळ आणि भोपाळींच्या संपर्कात आहे पण मला हा अनुभव कधीच आला नाही. तुम्ही कुठेही रहा, “संगतीचा प्रभाव असतो”.
व्हायरल होत असलेले विवेक अग्निहोत्री यांचे विधान केव्हा आणि कोणत्या संदर्भातील आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर दिग्दर्शकाच्या बाजूने काय विधान येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
विवेक अग्निहोत्रींचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटाने 13 दिवसांत 200 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटातील स्टारकास्टच्या अभिनयापासून ते विवेक अग्निहोत्रीच्या दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचे कौतुक होत आहे.

























































