शहरीकरण आणि व्याघ्र क्षेत्राचा समतोल हवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

चोरटय़ा शिकारी आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होणे याच कारणांमुळे वाघांची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. त्यामुळेच ही वाघाची डरकाळी लुप्त होते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. वाघाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करू लागले. अशा परिस्थितीत वाघ आणि माणसाचे संबंध बिघडलेले जाणवते. वाढते शहरीकरण आणि व्याघ्र क्षेत्राचा समतोल साधण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना आवश्यक आहे. नाहीतर हा संघर्ष सुरूच राहील. तेव्हा परिस्थिती चिघळण्याआधीच शासकीय स्तरावर नैसर्गिक आपत्ती म्हणून दखल घेणे आवश्यक वाटते.

देश-विदेशात हजारो पर्यटक अभयारण्यास भेटी देत असतात. निरनिराळे प्राणी, पशुपक्षी ते बघतात, पण त्यांचं खास आकर्षण असते ते व्याघ्रदर्शन. 29 जुलै 2010 रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्गला भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्रदिन म्हणून घोषित करण्यात आला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात जवळ जवळ एक लाख वाघ होते असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जातो. तर काहींच्या मते ही संख्या चाळीस हजारांच्या जवळपास सांगितली जाते. आता तर ही संख्या चार हजारांवर इतकी खाली आली आहे. वाघांची शिकार झाल्याने, नैसर्गिक मृत्यू आल्याने तीन ते चार टक्के म्हणजे चार हजारांच्या जवळ वाघ शिल्लक आहेत. त्यापैकी 2200/2300 वाघ एकटय़ा हिंदुस्थानात आहेत. हिंदुस्थानातल्या वाघाची लांबी साधारणपणे साडेआठ ते 11 फूट असल्याचे आणि वजन दीड ते पावणेदोन क्विंटल असल्याचे सांगितले जाते. वाघ ताशी 65 ते 70 कि.मी.वेगाने पळू शकतो. हत्ती सोडून इतर प्राण्यांची शिकार तो करतो. हिंदुस्थानात असलेला वाघ हा रॉयल बेंगॉल टायगर म्हणून ओळखला जातो.

आपला देश हा जगातील सर्वाधिक वाघ असलेला देश आहे आणि म्हणूनच हिंदुस्थानसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. वाघांची संख्या जास्त असल्याने हिंदुस्थान ही व्याघ्र संवर्धनाची शेवटची आशा आहे असे म्हणतात. देशात 39 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात नागपूर विभागातील व्याघ्र प्रकल्पांत वाघांची संख्या अधिक आहेत, असा पाहणी निष्कर्ष असल्यामुळे नागपूरला जागतिक दृष्टीने वाघांची राजधानी संबोधण्यात येते.

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या माहितीनुसार 2012 ते 2017 या काळात 45 टक्के वाघांचा मृत्यू अनैसर्गिकरीत्या झाला. यात शिकार केलेल्या वाघाची संख्या 22 टक्के होती. 2014 च्या गणनेनुसार देशात वाघांची संख्या 2226 होती, तर जगभरात 3890 वाघाची संख्या नोंद आहे. 2018 साली ती महाराष्ट्रात 303 च्या जवळपास असल्याचे आकडेवारीत दिसते. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पः मेळघाट-अमरावती 42, ताडोबा-अंधारी- चंद्रपूर व असंरक्षित क्षेत्र 108 , पेंच-नागपूर 32 , सह्याद्री 3, नवेगाव-नागझिरा- गोंदिया जिल्हा 7, बोर-वर्धा जिल्हा 4, टिपेश्वर पांढरकवडा अभयारण्य 6 अशी वाघाची संख्या आहे. विदर्भातच ही संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात 312च्या जवळपास वाघांची नोंद वनविभागाकडे असल्याची माहिती वनमंत्री यांनी विधान परिषदेत दिली होती. त्यातीत 212 वाघ असून 100 बछडे असल्याची माहिती आहे. देशात चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. वाघाची संख्या मागील तुलनेत वाढली आहे. वाघाच्या मृत्यूची कारणे बघितली तर शिकारी, विद्युत प्रवाहाचा धक्का, दोन वाघांतला अधिवास संघर्ष यात वाघ मृत्यू पावले आहेत.

2016 सालात 100 वाघांचा मृत्यू झाला. 2017 सालात 98 वाघांचा मृत्यू झाला, तर 2018 सालात 100 वाघांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या सात/आठ वर्षांत मानव व वन्य प्राणी संघर्षात जवळपास पाचशेपेक्षा अधिक बळी गेले आहेत. विदर्भात याचा फटका जास्त बसला आहे. वाघाची संख्या वाढत असली तरी अशा कारणांमुळे वाघ आणि माणसातला संघर्ष वाढला आहे… तरीही वाघाशिवाय जंगल नाही. असा हा जंगलचा राजा, जंगलाचा श्वास आहे, ज्याला बघण्यासाठी लाखो पर्यटक अभयारण्याला भेटी देत असतात. कुठल्याही अभयारण्यात पर्यटक भेट देतात तेव्हा वाघाचं दर्शन व्हावं ही अपेक्षा ठेवून असतात. अनेक जंगली प्राणी दिसतात, पण वाघ दिसत नाही तोपर्यंत त्याची ट्रिप-पर्यटन पूर्ण होत नाही. त्याच कारणांमुळे पर्यटक आपला मुक्काम वाढवतात. गेल्या काही वर्षांची आकडेवारी बघितली, तर वाघ संपण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण वाघ संपला, नाहीसा झाला तर त्याची निर्मिती मानवाच्या हाती नाही.

दरवर्षी जागतिक व्याघ्रदिनानिमित्त हेच आवाहन केले जाते. आपण एक दिवसापुरता तो दिवस साजरा करतो, मग त्याचा विसर पडतो. वाघ ही जंगल संपत्ती आहे. तिची जपणूक व्हायला हवी. अनेक देशांची आर्थिक घडी या वन-जंगल संपत्तीवर बसली आहे. तेव्हा वाघांसह या वनसंपत्तीचे रक्षण होणे, करणे हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. वाघाची संख्या महाराष्ट्रात झपाटय़ाने वाढत आहे. आज जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त वाघ महाराष्ट्रात आहेत आणि त्यातील सुमारे 200 पेक्षा अधिक वाघ हे चंद्रपूर जिह्यासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत.

29 जुलै रोजी जागतिक व्याघ्रदिन साजरा करण्याचा उद्देश हाच की, वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करून जनजागृती करणे. जेणेकरून वाघ आणि माणूस यांच्यातील संघर्ष वाढणार नाही. त्यामुळेच वाघांचे जंगलातले अस्तित्व टिकून राहणार आहे आणि जंगलात वाघाची डरकाळी सतत ऐकू येणार आहे.

[email protected]