दिलीपकुमारचे भाऊ असलम खान यांचे निधन; कोरोनाची झाली होती लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे भाऊ असलम खान यांचे मुंबईतील लीलावती रुग्णालयात शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इस्केमिक हा हृदयाशी संबधित आजार होता. तसेच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

असलम खान दिलीपकुमार यांचे लहान भाऊ होते. लीलावती रुग्णालयाकडून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. काही दिवसांपूर्वी दिलीपकुमार यांचे भाऊ एहसान खान आणि असलम खान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. एहसान खान यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. वयोमानानुसार त्यांच्या शरीरात ऑक्सीजनची कमतरता आहे. तसेच कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे रुग्णालयाने सांगितले.