सावधान ! डिंभे धरण 93 टक्के भरले, घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

शिरूर,आंबेगाव तालुक्याला वरदान ठरत असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय अर्थात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात मागील 3/4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आज गुरुवार दि. 11 ला 93 टक्के भरले असून दक्षता म्हणून घोडनदी पात्रात आज दुपारी धरणातून 2520 पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती डिंभे धरण शाखा अभियंता तानाजी चिखले यांनी दिली. तर घोडनदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन ही चिखले यांनी केले आहे.

दरम्यान येथून पुढे पाऊसाचा जोर वाढल्यास डिंभे धरणातून घोड नदी पात्रात केव्हाही जादा पाणी सोडण्यात येईल. नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी असे आवाहन ही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, टाकळी हाजी, फाकटे, पिंपरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी नदीत असणाऱ्या विद्युत मोटारी व साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांकडून मिळत आहे.