डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे 19 व्या वर्षी आले अपंगत्व; अंथरुणाला खिळलेल्या तरुणाने ठोठावले हायकोर्टाचे दार

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वयाच्या 19व्या वर्षी अपंगत्व आलेल्या तरुणाने एक कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणी करत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. सुधीर हिरचंद्र भोसले असे या तरुणाचे नाव आहे.  अॅड. आशिष गायकवाड यांच्यामार्फत त्याने याचिका दाखल केली आहे. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. अंथरुणाला खिळलेल्या सुधीरची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची समिती स्थापन करावी. या समितीने त्यांचा अहवाल न्यायालयात सादर करावा, अशी मागणी अॅड. गायकवाड यांनी केली.

सुधीर आता नेमका कुठे आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. सुधीर सध्या पंढरपूरला आहे. त्याला रुग्णवाहिकेतून आणण्याची व्यवस्था केली जाईल, अशी हमी अॅड. गायकवाड यांनी दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने जे.जे. रुग्णालयाला  सुधीरची वैद्यकीय चाचणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी 16 जून 2025 रोजी होणार आहे.

डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी

मिरज येथील स्वस्तीयोग प्रतिष्ठान रुग्णालयातील डॉक्टरांमुळे मला कायमचे अपंगत्व आले आहे. याची सविस्तर चौकशी करुन दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी सुधीरने याचिकेत केली आहे. डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. सुनील कुलकर्णी डॉ. शेखर मालवे यांच्यावर ही कारवाईची मागणी करण्यात आली आहे

रुग्णालयातील कागदपत्रे जळाली

पोलिसांत याची तक्रार करण्यात आली. स्थानिक सरकारी रुग्णालयाकडून सुधीरची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पाच डॉक्टरांची समिती नेमण्यात आली. समितीने सुधीरला डॉक्टरांना चौकशीसाठी बोलावले नाही. 2019 मध्ये लागलेल्या आगीत सर्व कागदपत्रे जळाल्याचे रुग्णालयाने समितीला पत्र लिहून कळवले. कागदपत्रांअभावी या प्रकरणात निष्काळजीपणा झाला आहे की नाही हे सांगणे कठीण असल्याचा अहवाल समितीने दिला. हा अहवाल रद्द करण्याची मागणीदेखील याचिकेत करण्यात आली आहे