
राज्याच्या विविध भागांत मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सीना व भीमा नदी तसेच गोदावरी खोऱयातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. नद्या व ओढे दुथडी भरून वाहत आहेत. जायकवाडी, येलदरी, उजनी, गंगापूर, गिरणा धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे निर्माण होणाऱया पूरसदृश स्थितीमुळे 41 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी खोऱयात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 3 लाख क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे पैठण परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे 8 हजार 29 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. जालन्यातील 8 हजार 500, बीडमधील 2 हजार, नांदेडमधील 1 हजार 20 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सीना आणि भीमा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सोलापूरमधील 13 हजार 724 आणि धाराशीवमधील परांडा, भूम तालुक्यातील 3 हजार 957 नागरिकांचे स्थलांतर करून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
सोलापूर, धारशीवमधील पूरस्थिती लक्षात घेता स्थानिक पथकांबरोबर एनडीआरएफची प्रत्येकी 2 पथके तैनात करण्यात आली आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि अहिल्यानगर या जिह्यांत प्रत्येकी एनडीआरएफचे 1 पथक तैनात करण्यात आले आहे. नांदेड, जळगावमध्ये एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी लष्कराच्या पथकांचीही बचाव कार्यासाठी मदत घेण्यात येत आहे.
धरण पाण्याचा विसर्ग
जायकवाडी 3,00,000 क्युसेक
येलदरी 29,400 क्युसेक
उजनी 75,000 क्युसेक
सीना कोळेगाव 80,000 क्युसेक
गंगापूर 11,000 क्युसेक
गिरणा 54,500 क्युसेक
हतनूर 55,800 क्युसेक
बारावीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येत आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय आज राज्य परीक्षा मंडळाने घेतला. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती. परंतु मराठवाडा तसेच नाशिक, सोलापूर, अहिल्या नगर आणि अन्य काही जिह्यांमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुदतीत अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.
जिल्हा स्थलांतरित
सोलापूर 13,724
संभाजीनगर 8,029
जालना 8,500
बीड 2,000
धाराशीव 3,957
नांदेड 1,020
अहिल्यानगर 3,497