
प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नेमका कसा चालतो, हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. त्यांच्या या दौऱ्याची अधिकाऱ्यांना कसलीही कल्पना नसल्यामुळे एकच धावपळ उडाली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे माढा दौऱ्यावर असताना त्यांनी अचानकपणे उपळाई बुद्रूक आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी आरोग्य केंद्राची दप्तर तपासणी, कोरोना परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी प्रसूतिगृह, प्रयोगशाळा व कोरोना लसीकरण, डाटा एन्ट्री या खोल्यांची पाहणी केली. यावेळी गावातील नागरिकांनी आरोग्य केंद्रांच्या बाबतीत असलेल्या समस्या मांडल्या.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना समस्यांचे निराकरण करण्यासाठी सूचना दिल्या. जवळपास दोन तास जिल्हाधिकारी शंभरकर हे आरोग्य केंद्राची तपासणी करत होते. यावेळी येथील कामाबाबत समाधान न वाटल्याने त्यांनी सर्वांसमक्ष अधिकारी व कर्मचाNयांना फैलावर घेतले. तसेच, कोरोना चाचणी वाढविण्यासंदर्भात सूचना केल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव, डॉ. अमोल शिंदे, डॉ. धनराज कदम यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
उपळाईत मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात तपासणी
– जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक उपळाई आरोग्य केंद्रात आले असता वैद्यकीय अधिकारी यांच्या कक्षात लाइट नसल्याने बराच वेळ ते अंधारात बसले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मोबाईलमधील बॅटरीच्या प्रकाशात तेथील माहिती घेतली. जिल्हाधिकाNयांकडून आरोग्य यंत्रणेच्या घेतलेल्या झाडाझडतीने एकच खळबळ उडाली. वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले. येथील बहुतांश कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत ही गोष्ट समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना खुलासा करण्याचे आदेश दिले. येथील रुग्णवाहिकाही मुख्यालय सोडून कुर्डुवाडीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.
































































