
पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि युद्धविरामासाठी मध्यस्थी केल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा या मुद्दय़ांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. अखेर विरोधकांची ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करण्याची मागणी मान्य केली. त्यानुसार सोमवारपासून लोकसभेत तर मंगळवारपासून राज्यसभेत यावर वादळी चर्चा होणार आहे. या चर्चेदरम्यान विरोधक मोदी सरकारला सळो की पळो करून सोडण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील अणुयुद्ध टाळण्यासाठी आपण मध्यस्थी केली आणि दोन्ही देशांत शस्त्रसंधी घडवून आणली, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार करत आहेत. या मुद्दय़ावरून विरोधक चर्चेदरम्यान केंद्राला घेरण्याची आणि टीकेची झोड उठवण्याची शक्यता आहे.
शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
हिंदुस्थानची दहशतवादविरोधी भूमिका आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी हिंदुस्थानी खासदारांचे शिष्टमंडळ नेमण्यात आले होते. या शिष्टमंडळांनी 33 देशांचा दौरा करून तेथील नेत्यांशी चर्चा केली होती. हे खासदारही या चर्चेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, सभागृहात उपस्थित राहण्याबद्दल पुढील तीन दिवसांसाठी व्हीप म्हणजे पक्षादेश बजावलेला आहे.
बिहारवर चर्चा कधी?
बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या मुद्दय़ावरून विरोधक संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून आक्रमक झाले आहेत. याच मुद्दय़ावरून आठवडाभर कामकाज चालू शकले नाही. या मुद्दय़ावरही विस्तृत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे, परंतु अद्याप मोदी सरकारकडून त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हा मुद्दा पुढचा आठवडाही अधिवेशन गाजवण्याची शक्यता आहे.
चर्चेचा कालावधी वाढणार?
दोन्ही सभागृहांमध्ये प्रत्येकी 16 तास चर्चा होणार असून या चर्चेचा कालावधी वाढू शकतो. या चर्चेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सहभागी होण्याची शक्यता आहे.