
2019साली देशाचं वातावरण ढवळून टाकणाऱ्या दिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आरोपींना खोट्या चकमकीत ठार करण्यात आलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. सिरपूरकर कमिशनने केलेल्या या दाव्यावरून या प्रकरणी चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
26 नोव्हेंबर 2019 रोजी हैदराबाद येथे 26 वर्षीय दिशा या डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून ठार करण्यात आलं होतं. या तरुणीचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत शादनगर पुलाखाली सापडला होता. टोलवर दिशाची स्कूटर बंद पडल्याचं पाहून मदत करण्याच्या बहाण्याने चार जणांनी तिचं अपहरण, बलात्कार करून हत्या केली होती.
या प्रकरणामुळे देशात संतापाचा डोंब उसळला होता. या प्रकरणी अरिफ पाशा, जोलू शिवा, जोलू नवीन कुमार आणि चिंताकुंटा चेन्ना केशवुलू अशा चार जणांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर दोनच दिवसात हे चौघेही पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाले होते. दिशा प्रकरणातील घटनाक्रम कसा घडला, त्याची माहिती घेण्यासाठी या चौघांना घटनास्थळी आणण्यात आलं होतं. तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांना ठार केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
या प्रकरणावर संशय व्यक्त झाल्यामुळे तथ्य तपासण्यासाठी न्यायलयाने सिरपूरकर कमिशनची स्थापना केली होती. या कमिशनमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रेखा बालदोता आणि सीबीआचे माजी अध्यक्ष कार्तिकेयन यांचा समावेश होता.
या कमिशनने तपास करून आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात हैदराबाद पोलिसांनी जाणूनबुजून या चौघांची गोळ्या घालून हत्या केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना शिक्षा मिळायला हवी, अशी शिफारसही कमिशनच्या अहवालात करण्यात आली आहे. या प्रकरणी शुक्रवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली.
या दरम्यान तेलंगणा सरकारकडून युक्तिवाद करणाऱ्या शाम दिवान यांनी या चकमकीचा तपास करणाऱ्या कमिशनचा अहवाल सीलबंद राखण्याची मागणी केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या अहवालात गोपनीय असं काहीही नसून यात काही जण दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल, त्याचा निर्णय राज्यसरकार घेईल. पण, अहवाल सीलबंद ठेवता येणार नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


























































