शहापूरमधील आदिवासींना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

शहापुरातील आदिवासींना दादरच्या धरतीमाता क्रीडा मंडळाने मदतीचा हात दिला आहे. या मंडळाने बाभळे येथील 21 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. धरतीमाता क्रीडा मंडळ हे दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवते. या मंडळाने यंदा 51 व्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘एक हात मदतीचा’ या अभियनांतर्गत धरतीमाता क्रीडा मंडळाने बाभळे आणि नायकाचापाडा येथील कातकरी वस्तीतील 21 कुटुंबांतील 70 आदिवासींना किराणा सामान, महिला – मुली व बालकांना कपडे, बॅग, चादर, चटई, टॉवेल आणि एका कुटुंबाला ताडपत्री या वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रमात यशस्वी करण्यासाठी सोहम शक्तिधाम अनसईमाता देवस्थानने विशेष परिश्रम घेतले.

आश्रमाला भेट

सोहम शक्तिधाम अनसईमाता देवस्थान बाभळे येथील आश्रमात येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी मोठ्या चटई देण्यात आल्या. यावेळी बाभळे ग्रामपंचायत सरपंच विशाल मुकणे, सदस्य रमेश दिनकर, समन्वयक एस. व्ही. दवणे व ग्रामस्थ उपस्थित होते. मंडळाचे पदाधिकारी जितेंद्र आंबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सोहम शक्तिधाम अनसईमाता देवस्थानच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.