
वाडा तालुक्यात रोजगारासाठी ठिकठिकाणाहून आलेल्या स्थलांतरित मजुरांना संचारबंदीनंतर मालकांनी वाऱ्यावर सोडले. त्यामुळे प्रवासाची कोणतीही साधनं उपलब्ध नसल्याने हे स्थलांतरित मजूर आपल्या लहान लहान मुलांसह डोक्यावर बिऱ्हाड घेत भिवंडी – वाडा रस्त्यावरील कुडूस परिसरातून चालत जात असल्याचे वाड्याच्या गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांच्या निदर्शनास आल्याने. त्यांनी ही बाब उपविभागीय अधिकारी अर्चना कदम आणि तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या मजूरांना वाहनाने आपापल्या गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.
प्रशासनाने तातडीने वाहन व्यवस्था करून 10 मजूर देवबांध, 11 मजूर मोखाडा येथे पाठविण्यात आले. तर कुडूस परिसरातील 53 स्थलांतरित मजूरांना विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांच्याद्वारे वाहन व्यवस्था करून देवून जव्हार येथे त्यांच्या गावी पाठविण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या संवेदनशील कृतीने समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.



























































