सहाय्यक निबंधकाकडे मागितली 10 लाखांची खंडणी, संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्षाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, सांगली

संभाजी ब्रिगेडच्या सांगली जिल्हाध्यक्षला पोलिसांनी खंडणीची रक्कम घेत असताना पोलिसांनी अटक केली आहे. इस्लामपूरमध्ये पोलिसांनी  सुयोग औंधकर याला 10 लाख रूपये घेताना अटक केली. सरकारी अधिकाऱ्यांकडेच औंधकरने खंडणी मागितली होती. या खंडणीसाठी तो सहाय्यक निबंधकाला धमकावत होता हे तपासात उघड झाले आहे.

जानेवारी २०१७ मध्ये वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. यामधील उमेदवारी अर्जाची प्रसिद्धी नोटीस फलकावर का केली नाही असे विचारत औंधकरने सहायक निबंधक आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल डफळेंना धमकवायला सुरुवात केली. ही यादी प्रसिद्ध न केल्याने तुम्ही पदाचा गैरवापर करीत आहात, माझ्याकडे या संदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जमवलेली माहिती देखील आहे असं औंधकरने या डफळेंना धमकावले होते. या प्रकरणात अडकायचे नसेल तर मला 10 लाख रूपये द्या असं म्हणत औंधकरने खंडणी मागितली होती.

अमोल डफळे यांनी खंडणीची 10 लाख रूपयांची रक्कम द्यायचं कबूल केलं, ते शुक्रवारी ही रक्कम देणार होते. मात्र याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी पैशांची देवाण-घेवाण सुरू असतानाच औंधकरला अटक केली. स्वत:ला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवणारा औंधकरचा साथीदार कृष्णा जंगम यालाही पोलिसांनी अटक केली आहे.