दिवावासीयांच्या माथी नवे बेकायदा डम्पिंग, खाडीकिनारी तिवरांची कत्तल करून भराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवावासीयांच्या माथी पुन्हा नवे बेकायदा डम्पिंग मारले जात आहे. मुंब्रा आणि दिवा दरम्यान असलेल्या खाडीत शेकडो एकर जमिनीवर नवीन डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यात येत आहे. खाडीकिनारी तिवरांची कत्तल करण्यात आली असून आता त्यावर कचऱ्याचा भराव टाकण्यात येत आहे. दिवसाढवळ्या त्याठिकाणी कचऱ्याचे शेकडो डंपर रिकामे करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या बेकायदा डम्पिंगचा गंभीर प्रश्न बनला असून डम्पिंगमुळे दिवावासीयांवर पुन्हा आरोग्याचे संकट उभे राहिले आहे.

दिवावासीयांच्या विरोधानंतर ठाणे पालिका प्रशासनाने येथील डम्पिंग बंद करून भंडार्ली येथील जागा महापालिकेने ताब्यात घेत त्या जागेवर डम्पिंग सुरू केले. भंडार्ली येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर १ सप्टेंबर २०२३ पासून डायघर येथे प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतर ठाणे शहराचा कचरा भिवंडीतील आतकोली क्षेपणभूमी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेला जातो. मात्र आता पुन्हा नव्याने दिवा-मुंब्रा खाडीत शेकडो एकर जमिनीवर नवीन डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यात आले आहे. सीआरझेड क्षेत्राला बाधित करत हजारो टन कचरा टाकला जात असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. या बेकायदा कचरा डम्पिंगविरोधात पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून याप्रकरणी स्थानिक नागरिक लवकरच जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिका आयुक्त यांची भेट घेणार आहेत.

भरावामुळे दिवा बुडणार

कांदळवणाची कत्तल करून सुरू असलेल्या भरणीबाबत स्थानिक भूमिपुत्रांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. भराव टाकून नाले बुजवण्यात आले असल्याने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला आहे. दरम्यान डम्पिंगच्या या भरावामुळे यंदा दिवा बुडणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

“येणाऱ्या पावसाळ्यात दिवा शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तत्काळ उपाययोजना करण्यात यावी. भविष्यात होणारी हानी टाळावी आणि योग्य ती कार्यवाही करावी. बेकायदा डम्पिंग ग्राऊंड विरोधात शिवसेना आक्रमक पवित्रा घेणार घेईल.”                                                                                                              – सचिन पाटील (शहरप्रमुख, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)