मनतरंग – मृगजळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

सातासमुद्रापलीकडे जेव्हा मुलं, विशेषत मुली लग्न होऊन जात असतात तेव्हा अनोळखी ठिकाणी संसार करणं हे त्यांच्या समोर एक प्रकारचं आव्हान असतं. यात सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या मुलीचा होणारा नवरा हा स्वभावाने कसा आहे हे जाणून घेणे. अन्यथा केवळ परदेशात स्थायिक असलेला जावई या मोहापायी ठरलेलं हे नातं एक मृगजळ ठरतं.

सई (नाव बदलले आहे) एअरपोर्टवरून जशी गेटकडे येत होती तसं वीणाताईंच्या आणि अशोकरावांच्या (नावे बदलली आहेत) काळजात धस्स झालं. सईचं कमालीचं वाढलेलं वजन, निस्तेज आणि खोलवर गेलेले डोळे, तिचं गबाळेपण हे त्या दोघांच्याही मनावर खोलवर जखम करून गेलं आणि पुढे काय वाढून ठेवलंय याची त्यांना पुरेपूर कल्पना आली. सई त्यांच्याकडे येतच होती. तिला बघून वीणाताईंना भडभडून आलं. त्या तिच्याशी बोलणार इतक्यात “झालं ना तुझं समाधान?r” असं म्हणत  सई वीणाताईंच्या अंगावर खेकसली. “तुलाच तुझ्या जावयाचा पुळका आला होता ना? चांगले आहेत आमचे जावईबापू, फॉरेनला राहतात, आमची आता फॉरेन ट्रिप पक्की असंच सगळ्यांसमोर फुशारक्या मारायचात ना. करा करा! त्याच्या बरोबर ट्रिपला जा. मजा करा.” सई त्या दोघांना एअरपोर्टवरच बडबडत होती.

सई…साधारण तिशीत आलेली, सुशिक्षित, एकुलती एक आणि लग्न होऊन परदेशात नवऱ्याबरोबर स्थायिक झालेली तरूणी. सईला खरं तर परदेशाचं आकर्षण तसंही नव्हतं आणि लग्न होऊन तिथेच सेटल होणंही तिला तसं मनात नव्हतं. तिला इथेच स्वतच्या शिक्षणाचा उपयोग करून काहीतरी व्यवसाय करायचा होता. तशी तयारीही तिने मैत्रिणींच्या सहाय्याने सुरू केली होती, पण ओळखीतलं स्थळ आलं. सईच्या घरात सगळ्यांना आवडलं आणि मग लग्न करण्यासाठी तिच्यावर अजाणतेपणी आईवडिलांकडून दबाव आणला गेला. तिला खरं तर तिच्या भावी नवऱ्याला जाणून घ्यायचं होतं, पण “नात्यात आहे. कर बिनधास्त” हे आईवडिलांचं बोलणं ऐकून ती लग्नाला तयार झाली.

सईचं लग्न हा विषय खरं तर कौतुक सोहळाच झाला. विशेषत तिच्या नवऱ्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं वीणाताई आणि अशोकरावांना झालं होतं. सई हे सर्व सावधपणे (काहीशा साशंकपणेच) अनुभवत होती. तिचा नवरा हा अगदीच अबोल आणि तिच्या माहेरच्यांशी बोलताना, वागताना एकदमच तोलामोलाचं करत होता हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं. त्याच्या बोलण्यातली तिच्या माहेरच्यांबद्दल असलेली तुच्छतादर्शक ढब जशी सईला समजली तशी ती दुखावली गेली, पण वीणाताई आणि अशोकराव आपली लाडकी लेक एका श्रीमंत घरात गेली याच आनंदात होते. त्यात त्या दोघांना या गोष्टी लक्षात आल्या नाहीत.

लग्न होऊन सई परदेशात गेली, पण तिथे गेल्यानंतर तिला काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. तिचा नवरा हा कमालीचा व्यवहारी आणि नोकरी-पैसा सोडून कशातही रस नसलेला असा होता. तिथे गेल्यावर तिसऱ्याच दिवशी त्याने ऑफिसला जायला सुरुवात केली. पूर्ण दिवस ऑफिसचं काम करूनही घरी आल्यावर त्याच कामात, विचारांत तो रहायचा. घरी आल्यावर सईची फक्त “कसा होता दिवस?” अशी माफक चौकशी आणि ती काही बोलायला लागली तर “ओके! मला झोप येतेय. उद्या बोलू” असं बोलून तो झोपायचा. तिथे अनोळखी जागेत हे असं एकटं राहणं सईला असह्य व्हायला लागलं.

एक दिवस असंच ते दोघं तिच्याशी बोलत असताना अचानक सईचा नवरा आला आणि तिने खाटकन् कॉल कट केला. वीणाताई आणि अशोकरावांना क्षणभर कळलंच नाही. रेंज गेली असेल असा विचार करून अशोकराव पुन्हा कॉल करायला गेले तेव्हा सईने तो उचललाच नाही. “मग बोलू” असा तिचा व्हॉटस्आप मॅसेज पाहिल्यावर कुठेतरी हिचं बिनसलं असावं का? ही शंकेची पाल त्या दोघांनाही चुकचुकून गेली खरी.

“आता आठवून काय उपयोग? तेव्हा मला विचारलंत का? काय झालं म्हणून? इमेजची काळजी पडली होती ना दोघांना? मुलीचं काही झालं तरी चालेल. मग मला ही ह्यांची खोटी सांत्वना का?” सई समुपदेशनाच्या सत्रात तावातावाने दातओठ खात उद्गारली.

“बघा. ही अशी काही दिवसांपासून करतेय. सारखी चिडचिड आणि स्वतला खोलीत बंद करून घेतलंय. दिवस-दिवस आंघोळ नाही की नीट खाणं-पिणं नाही. त्या दिवशी तर सईने झोपेच्या सगळ्या गोळ्या हातात घेतल्या होत्या. आम्ही अडवलं तिला” वीणाताई काळजीने म्हणाल्या.

सईकडे पाहिल्यावर, तिची माहिती जाणून घेतल्यानंतर तिला नैराश्य आलं होतं हे जाणवलं. त्या दिवशी फोन ठेवण्याचा प्रसंगही तिने सांगितला. तिचा नवरा कायम तिच्या घरी असण्यावर राग धरून होता. त्याला तिने पैसे कमवावेत असे वाटायचे. मात्र सईला तेवढा आत्मविश्वास नव्हता. कारण ती बाहेर अशी पडलीच नव्हती. तो तिला कायम पैशावरून बोलायचा. तिच्या सगळ्या गोष्टींवर त्याची नजर असायची. ती वेळ जावा म्हणून टी.व्ही. आणि मोबाइलवर असायची. ते त्याला खटकायचं. “पैसा कमवायची अक्कल नाही, तर जास्त दुसऱ्याच्या पैशावर मजा मारू नये” हे त्याचे शब्द तिला जिव्हारी लागले आणि तिने मोबाईल आणि टीव्हीचा स्वतसाठी वापर बंद केला. सईची नैराश्याची कारणं ही समोर दिसतच होती. त्यात दोघांमध्ये एकतर नातं तयार झालं नव्हतं आणि त्याची कल्पना कोणालाच आली नाही.

आज बऱ्याच घरांत अशा सई आहेत, ज्या या कारणांमुळे नैराश्यात गेल्या आहेत. सातासमुद्रापलीकडे जेव्हा मुलं, विशेषत मुली लग्न होऊन जातात तेव्हा अनोळखी ठिकाणी संसार करणं हे त्यांच्या समोर एक प्रकारचं आव्हान असतं. त्यात त्यांना फक्त आणि फक्त समजून घेण्याची आवश्यकता असते. त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलीचा होणारा भावी नवरा हा स्वभावाने कसा आहे हेही जाणून घेणं गरजेचं आहे. त्यात कुठेतरी वीणाताई आणि अशोकराव कमी पडले होते.

मात्र ही वेळ दोषारोप करण्याची नव्हती, तर त्यातून यशस्वीरीत्या  बाहेर पडण्याची होती. सईला असं ठसवण्यात आलं. तसंच ती आता तिच्या आईवडिलांकडे असल्यामुळे स्वतंत्र आणि सुरक्षित आहे हे तिला लक्षात आणून दिलं गेलं. तिचा आईवडिलांबद्दल राग कमी होत नव्हता. मात्र तो राग ती दुखावली गेल्यानेच होता. सईला “आयुष्यात पुढे जायचं असेल तर आईवडिलांना माफ कर. तेही चुकू शकतात. कारण ते दोघेही माणसंच आहेत” हे वारंवार समजावलं गेलं. कारण त्यांना ती “आईवडील चुकूच कसे शकतात?” याच दृष्टिकोनातून पाहत होती. त्यामुळेच तिला त्यांना माफ करणं जमत नव्हतं. मात्र समोरासमोर जेव्हा त्या तिघांची चर्चा घडवून आणली गेली तेव्हा अशोकरावांनी “मला तुझं सुख दिसलं. बाकी विचार मी नाही केला,” असं सांगितलं तेव्हा सई विरघळली आणि पुढे तिच्यावर काम करणं सोपं झालं.

या सत्रांत प्रत्येक दिवसाची आखणी करणं, स्वतला व्यवस्थित वेळ देणं, व्यायाम व आहाराकडे लक्ष, पुरेशी झोप, छंद जोपासणं आणि मित्रपरिवार पुन्हा जोडणं, स्वतला व्यस्त ठेवणं, मनमोकळं बोलणं असे उपाय तिला सांगितले गेले. त्याच्या जोडीला राग, ताण व्यवस्थापन, विचार-भावनांची सांगड घालणं हेही तिला शिकवण्यात आलं. आज सई तिच्या पायावर उभी आहे. तिच्या न झालेल्या नात्याचा ती पुनर्विचार करतेय. त्यासाठी तिने नवऱ्याकडे आणि सासरच्यांकडे थोडा वेळ मागितलाय आणि सईच्या कोणत्याही निर्णयात वीणाताई आणि अशोकराव तिच्या पाठीशी खंबीर उभे आहेत.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)