स्वागत दिवाळी अंकांचे

अक्षरभेट

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर या विषयाला अनुसरून विविध् पातळीवर लेखन झाले. त्यालाच अनुसरून हा दिवाळी अंक आहे. दरवर्षी वेगळा विषय मांडला जाणाऱया या अंकातही ‘अभिजात मराठी’ हा विषय घेऊन त्या प्रश्नाचे वेगवेगळे पैलू मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कथा,किविता, लेख, भविष्य, व्यंगचित्रे असा भरगच्च मजपूर देत वाचकांना वाचनानंद देण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. यातील ‘बोलीभाषा आणि अभिजातता’, ‘मराठी भाषा आणि पारिभाषिक शब्द’, ‘मराठी भाषेची चिंता आणि चिंतन’ हे लेख महत्त्वपूर्ण आहेत. सना पंडित, राजेंद्र भोसले, डॉ. विलास देशपांडे, प्रसाद पुलकर्णी, दिलीप चावरे यांचे लेख आवर्जून वाचण्याजोगे आहेत. सोबत ग.दि. माडगूळकर यांच्यावर आधारित प्रा. प्र. अ. पुराणिक यांचा लेख, ‘युद्ध नको बुद्ध हवा’ – अनंत देशमुख यांचा लेख, ‘गोष्टी स्वप्ननगरीच्या’ – प्रकाश बाळ जोशी हे वेगळ्या विषयांवरील लेख वाचायलाच हवेत.

संपादक ः सुभाष सूर्यवंशी
पृष्ठ ः 176 मूल्य ः 150 रुपये

लीलाई

‘लीलाई’ दिवाळी अंकाचे हे 26 वे वर्ष. नेहमीप्रमाणे या दिवाळी अंकात वाचनीय विषयांची रेलचेल आहे. कथा, कविता, परिसंवाद, ललित, व्यक्तिचित्रण, व्यंगचित्रे असे विविधांगी साहित्य वाचकांना या अंकात मिळेल. लेख या विभागात ‘खेळता नेटके दशावतारी’ हा लोककलेचे अभ्यासक प्रा. प्रकाश खांडगे यांचा लेख आहे, तर ‘मेसम्मा’ ही गंगाराम गवाणकर यांची एकांकिका अंकाचे वाचनीय महत्त्व वाढवणारी आहे.

संपादिका ः पूजा रोकडे
पृष्ठ ः 218 मूल्य ः 300 रुपये

युगांतर

साम्यवादी विचारसरणी मांडणाऱया ‘युगांतर’ दिवाळी अंकाचे हे 26 वे वर्ष. यंदा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत.त्यानिमित्त अंकात चळवळीच्या 100 वर्षांचा आढावा घेतला गेला आहे. स्थापनेपासून कम्युनिस्ट चळवळीने काय काय मिळवले व येत्या काळात ती पुढे कशी नेता येईल यावर आधारित लेख अंकात आहेत. लक्ष्मीकांत देशमुख, हेमंत देसाई, आनंद मेणसे व उत्तम कांबळे या मान्यवर लेखकांचा पक्षाच्या शतकी वाटचालीचा लेखाजोखा मांडणारा महत्त्वपूर्ण लेख आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आढावा संजय चिटणीस यांनी तर महिला चळवळीचा आढावा पुंदा प्रमिला नीलपंठ यांनी घेतला आहे.

संपादक ः डॉ. भालचंद कानगो
पृष्ठ ः 266 मूल्य ः 300 रुपये

आश्लेषा

वाचनीय आनंद देणारा ‘आश्लेषा’ दिवाळी अंक. ‘कथा थोडय़ाशा वेगळ्या’ या विभागात वेगळ्या कथा दिल्या आहेत. श्रीकांत बोजेवार, मीनाक्षी पाटील, निर्मोही फडके, रामदास खरे यांच्या कथा आवर्जून वाचाव्यात अशा आहेत. अनुवादित कथा विभागात रवींद्र गुर्जर, चंद्रकांत भोंजाळ, राजीव जोशी, धनश्री करमरकर यांच्या कथा आहेत. सोबत नवकादंबरीवर आधारित विभाग वाचकांना नक्कीच आवडेल. ‘अभिजात मराठी भाषा’ या विषयावर आधारित मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांची मुलाखत वैशिष्टय़पूर्ण. ‘ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि गाणी’ हा दीपाली केळकर यांचा लेख आवर्जून वाचावेत असे आहेत.

संपादक ः अशोक तावडे

पृष्ठ ः 192 मूल्य ः 250 रुपये

शब्दरुची

‘शब्दरुची’ या दिवाळी अंकाचे यंदा तेरावे वर्ष आहे. अमोल साळे यांचा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी मनाचे भविष्य’, माधव जोशी यांचा ‘जागतिक परिस्थिती आणि भारतीय उद्योग’ यांसारखे सध्या चर्चेत असणाऱया विषयांवरील लेख आहेत. चंद्रशेखर सानेकर यांचा ‘नवे गझलकार एकविसाव्या शतकाचे’ हा लेख आहे. त्याचप्रमाणे या दिवाळी अंकात पाच कथा, दोन जन्मशताब्दी लेख, 18 लेख, अनेक वाचनीय गझल आणि कविता आहेत.

संपादक ः अरुण जोशी
पृष्ठ ः 168 मूल्य ः 300 रुपये