दिवाळी अंक – युगांतर

डाव्या विचारधारेला वाहिलेल्या साप्ताहिक युगांतरचा प्रत्येक वर्षीचा दिवाळी अंक अतिशय वाचनीय अभ्यासनीय असतो. यंदाचा दिवाळी अंक साहजिकच विचारसंपन्न लेख, कथा कवितांनी नटलेला आहे. या अंकात टाळेबंदीमुळे गरीबांचे हाल टिपणारी फोटोस्टोरी हे या अंकाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणायला हवे. लक्ष्मीकांत देशमुख यांचा संविधानातील समाजवाद कालबाह्य झाला आहे? डी. राजा यांचा उदयास येणारी जागतिक व्यवस्था आणि भारत, अजित अभ्यंकरांचा आपत्तीशी सामना, अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद चापानेरकर व महादेव खुडे यांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख, महाराष्ट्रातील जात वास्तव या विषयावरील शांताराम पंदेरे यांचा लेख, बँकांच्या राष्ट्रीयीकरण व खासगीकरणावर लिहिलेले देविदास तुळजापूरकर व सुरेश धोपेश्वरकर यांचे लेख, याशिवाय महावीर जोंधळे, पंकज करुलकर, शैलेश जोशी यांच्या कथा, प्रा. विद्या बोरसे यांनी अनुवादित केलेल्या आफ्रिकी अमेरिकन कवयित्री नायरा वहीद यांच्या कविता अशा दर्जेदार साहित्याने नटलेला व डाव्या विचाराचे नेते डॉ. भालचंद्र कानगो यांनी संपादित केलेला हा 172 पानांचा दिवाळी अंक अतिशय वाचनीय झाला आहे.

संपादक – डॉ. भालचंद्र कानगो, मूल्य – 120 रुपये

दर्यावर्दी

सागरी जीवनाला वाहिलेल्या ‘दर्यावर्दी’ या दिवाळी अंकाचे यंदाचे हे 78 वे वर्ष आह़े प्ऱा ड़ॉ सूर्यकांत येरागी, मेजर प्ऱा ड़ॉ सुप्रिया येरागी यांच्या नैसर्गिक मत्स्यौषधी या लेखात मासे किती उपयुक्त आहेत याची विस्तृत माहिती देण्यात आली आह़े गोबरा मासा, शिंपले, शिवंड, बोंबिल, तारली, बांगडा, मोरी, मेंच, मानेली, बोईट, माकूल, बेबा असे अनोळखी-ओळखीच्या माशांचे गुणधर्म तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील़ किनारपट्टीवरील नयनरम्य देखावा रापण या लेखात ड़ॉ येरागी यांनी मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱया रापण पद्धतीविषयी माहिती दिली आह़े याव्यतिरिक्त पंढरीनाथ तामोरे यांची कोकणची ओढ, श्रद्धा तोरसकर यांचे बालसंस्कार, समता गंधे यांची चिंधी, जयेश मगर यांचा महाराष्ट्र देशा, प्ऱा अ़ ऩा पेंडणेकर यांचा पनामा कालवा, पांडुरंग भाबल यांचा कोरोनाशी लढा एक आव्हान, कठीण कवचधारी अमेरिकन शिंपला, भानू शिरधनकर यांची अखेर जमिनीस पाय टेकले, श़ा श़ां भालेराव यांची आंधळी न्यायदेवता, नितीन राणे यांची वेडी माया अशा विविध कथा, लेख या अंकात समाविष्ट आहेत़
संपादक – अमोल सरतांडेल,

मूल्य – 100 रुपये

चपराक

‘चपराक’ हा दिवाळी अंक विविध विषय घेऊन वाचकांच्या भेटीला आला आह़े नवीन पिढी प्रॅक्टिकल होत आह़े ती अधिक व्यवहारी होत आहे पण ती भावनाशून्य तर होत नाही ना हाच विचारांचा धागा पकडून प्रवीण दवणे यांनी नवी पिढी प्रॅक्टिकल की भावनाशून्य यावर लिखाण केले आह़े या अंकात घनश्याम पाटील यांनी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची घेतलेली मुलाखत, श्रीनिवास भणगे यांचा गुरुमंत्र, दिनकर जोशी यांनी 1960 नंतरच्या कवितांची घडवलेली सफर, भाऊ तोरसेकर यांचा कॅपिटल पत्रकारितेवर डिजिटल माध्यमांची मात, अंजली कुलकर्णी यांची कहाणी हिंदू कोडबिलाची, श्रीराम पचिंद्रे यांचा विद्रोहाला हवी विवेकाची जोड, हरीश केंची यांचा माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा शापित चाणक्य असे विविध विषयांवरील लेख आवर्जून वाचावे असेच आहेत़ याव्यतिरिक्त माधव गिर, आसावरी काकडे, प्रल्हाद दुधाळ, दुर्गेश सोनार, पल्लवी देशपांडे, पूजा बागुल, सुनंदा शिंगनाथ, गिरीश दुनाखे, ड़ॉ संगीता घुगे यांच्या कविता तर सोबत आहेतच, शिवाय शिरीष देशमुख, ऐश्वर्य पाटेकर, सदानंद भणगे, सुनील जवंजाळ, आदींच्या कथाही वाचनीय आहेत़

संपादक – घनश्याम पाटील, मूल्य – 250 रुपये

सकाळ

विविध विषयांची खुमासदार मांडणी घेऊन सकाळचा यंदाचा दिवाळी अंक वाचकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. कोरोनाचा हाहाकार आणि त्यानंतर बदललेले सर्वांचे विश्व यावर कोरोनोत्तर जग… आता युद्ध विषाणूंविरूद्ध या डॉ. श्रीपाद जोशी यांच्या लेखाने अंकाची सुरुवात होत आहे. मानव जातीचा ढासळणारा तोल आणि पर्यावरणविषयक जागरूकता करणारा पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांचा धुक्यातून ताऱयाकडे हा लेख डोळ्यांत अंजन घालणारा आहे. कोरोना महामारीने जगावर आलेले संकट परतवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने केलेला संघर्ष, यातून काय घडले आणि काय बिघडले सांगणारा डॉ. मोहन जोशी लिखित वैद्यकीय बेरीज वजाबाकी हा लेख आहे. याबरोबरच कृषिविश्वातून ज्येष्ठ पत्रकार आणि कृषी अभ्यासक अमर हबीब यांनी भविष्यात शेतमाल विक्रीसाठी ई कॉमर्स कंपन्यांना सामावून घेण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले आहे. खाण्याच्या बदलत्या ट्रेण्डबद्दल लेखक प्रशांत ननावरे, भविष्य सांगणाऱया ज्योतिषांचे बिंग फोडणारा रवी आमले यांचा लेख, जाहिरातबाजीविषयक मोहिनी मोडक यांनी मांडलेले विचार, ऑनलाइन अभ्यासामुळे वाढलेले स्क्रीन टाइमबाबत जयवंत चव्हाण यांचा लेख, सचिन दरेकरांच्या शब्दांत सिनेसृष्टीची बदललेली दृष्टी, रोजगार क्षेत्राचे आकडे सांगणारा सचिन टेके यांचा लेख अत्यंत उल्लेखनीय आहे.

संपादक ः श्रीराम पवार, मूल्य – 75 रुपये.

आपली प्रतिक्रिया द्या