
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली असून, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षासाठी २०० जागा जिंकण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. शनिवारी डीएमके युथ विंगच्या परिषदेत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना या ध्येयासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री स्टालिन म्हणाले की, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण सर्व ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते आणि ते पूर्ण करून दाखवले. आता २०२६ मध्ये नवा विक्रम प्रस्थापित करण्याची वेळ आली असून आमचे लक्ष्य २०० विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचे आहे.” स्टालिन यांनी केंद्र सरकारवर तामिळनाडूच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. अर्थसंकल्पात तामिळनाडूसाठी एकही मोठी योजना देण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी डीएमकेचे राज्यसभा खासदार पी. विल्सन यांनी आकडेवारीसह केंद्र सरकारवर टीका केली. रेल्वे बजेटचे उदाहरण देत ते म्हणाले की, गुजरातला मिळणारा निधी २९ पटीने वाढला, तर तामिळनाडूच्या निधीत त्या तुलनेत अत्यंत कमी वाढ झाली आहे. तामिळनाडूला केवळ ७.५ पट वाढ मिळाली आहे, जी राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.






























































