
>> ज्ञानेश्वर भि. गावडे
धारावीच्या 567 एकर जागेत पसरलेली आणि सुमारे तीन लाख लोकवस्ती असलेली धारावीची झोपडपट्टी पूर्वी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याचे सांगितले जात होते, परंतु गेल्या चार दशकांत रोज तीनशे कुटुंबांचा आदळणारा लोंढा मुंबईमध्ये, विशेषतः मुंबईच्या उपनगरांतील झोपडपट्ट्यांचा विस्तार एवढा वाढवीत आहे की, त्यांनी केव्हाच धारावी झोपडपट्टीचा पहिला क्रम डावललेला आहे. 1) कुर्ला-घाटकोपरमधील डोंगर उतार व पायथे 2) पश्चिम उपनगरांकडील योगी हिल व दिंडोशीच्या परिसरापासून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानलगतचा पट्टा 3) भांडुप-मुलुंडजवळचे डोंगरी उतार व पायथे यापासून ते थेट येऊरच्या जंगलापर्यंत आणि 4) मानखुर्द – गोवंडी पट्ट्यापासून ऍण्टॉप हिल, गीता नगर, वरळी आदी भागातील समुद्री किनार्यांच्या दलदलीलगतच्या भागावरील वसलेल्या झोपड्यांचा आकडा विचारात घेतला तर नक्कीच धारावीतील झोपड्यांच्या संख्येला मागे टाकतील.
1991 च्या शिरगणतीत मुंबईतील गलिच्छ वस्तीमध्ये राहणार्यांचे सुमारे 24 लाख वस्तीचे म्हणजे एकूण मुंबईच्या लोकवस्तीचे प्रमाण साडेतेवीस टक्के होते ते 2011 च्या शिरगणतीमध्ये 78 टक्क्यांवर गेलेले आहे. उपनगराची लोकसंख्येची घनता तर चौरस किलोमीटरला एकवीस हजारांवर गेलेली आहे. कारण कनिष्ठ मध्यम वर्ग आणि अल्प उत्पन्न गटातील गरीबांचा लोंढा मोठ्या संख्येने उपरोक्त चार पट्ट्यांत विस्तारला आहे. घरे नाहीत म्हणून दुर्दैवांने झोपड्यांचा आश्रय घेतला जात आहे, तर याच मुंबईच्या उपनगरात सुमारे दीड लाख सदनिका ग्राहकांची वाट पाहत आहेत. मुंबईतील सुमारे पाच हजार उत्तुंग इमारतीकडे रात्रीच्या वेळी नुसते बघितले तरी असंख्य संख्येने अंधारातली ही घरे नजरेत भरतील. जाहिरातबाजी करूनही बिल्डरांना परवडणारी गिर्हाईके मिळणे मुश्कील झालेले आहे, तर घरांची मूलभूत गरज असणार्यांना त्यांच्या कुवतीचे घरे मिळण्याची मारामार झालेली आहे. रिकाम्या उत्तुंग इमारती आणि पसरलेल्या झोपडपट्ट्या या भीषण विषमतेचे वास्तव दाखवीत आहेत.





























































