
सामना ऑनलाईन । मुंबई
थायलंड येथील ४४ वर्षीय महिलेने तेथील खाजगी रुग्णालयात सवलतीच्या दरात स्तन प्रत्यारोपण केले. मात्र सवलतीच्या दरात करण्यात आलेली सर्जरी तिला भलतीच महागात पडली. सिलीकॉन इजेक्शन देऊन करण्यात आलेली ही सर्जरीमुळे या महिलेचा जीवही जाऊ शकला असता. पंरतू, मुंबईतील वोक्खार्ट रूग्णालयात ती वेळीच आल्याने येथील डाँक्टरांना तिच्यावर अचूक उपचार करत जीवावर बेतलेला हा धोका टाळता येऊ शकला व तिची सुखरूप पुन्हा आपल्या मायदेशी परतू शकली.
मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात या महिलेने उपचाराकरिता धाव घेतली असता, स्तन प्रत्यारोपणाच्या नावाखाली थायलंड येथील डॉक्टरांकडून तिची फसवणूक करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार शस्त्रक्रियेनंतर चार महिन्यानंतर तिचे स्तन लाल, रंगहीन आणि आकाराने वाढल्याचे लक्षात आले. तिने फॉलोअपसाठी पुन्हा त्या क्लिनिकला भेट दिली तेव्हा तिला समजले की क्लिनिक बंद झाले आणि डॉक्टर देखील गायब झाले.
मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयाचे ऑनकोलॉजिस्ट डॉ. मेघल संघवी सांगतात या प्रकरणी महिलेचे स्तन प्रत्यारोपण न करता तिला सिलीकॉन इंजेक्शन देण्यात आले आणि असे करणे त्या महिलेच्या आरोग्यासाठी धोकादायक होते. या प्रकरणी महिलेला जीव देखील गमवावा लागला असता. मात्र अचूक उपचारांमुळे हा धोका आज टळला असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. सिलीकॉन इंजेक्शनमुळे शरीरावर होणारे घातक परिणाम पाहता एफडीएने यावर कायदेशीर बंदी देखील आणल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वोकहार्ट रुग्णालयाचे कन्सलटंट रेडिओलॉजीस्ट डाँ. भाग्यम नागराजन सांगतात अशा प्रकरणात सदर महिलेला कॅन्सर होण्याची शक्यता होती. स्तनामधील सिलीकॉनच्या लहान तुकड्यांना काढून टाकणे अशक्य असल्याने स्तन पुननिर्मितीचा पर्याय वापरण्यात आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यामुळे महिलेच्या जीवाला असलेला धोका आता पूर्णपणे टळला आहे.


























































