किल्ले पाहिलेला माणूस; दुर्गभ्रमंतीकार गो. नी. दांडेकर यांच्यावर माहितीपट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली व संपूर्ण आयुष्य दुर्गभ्रमंतीमध्ये झोकून दिले, असे दुर्ग महर्षी- गोपाल नीलकण्ठ दांडेकर यांच्या आयुष्यावर आणि विचारांवर माहितीपट बनवण्यात आला आहे. ‘किल्ले पाहिलेला माणूस’ असे या माहितीपटाचे नाव असून त्याची निर्मिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली आहे.

 प्रसिद्ध कादंबरीकार, दुर्गभ्रमंतीकार गो. नी. दांडेकर यांनी अनेक किल्ले पाहिले. या किल्ल्यांच्या भटकंतीमधून त्यांनी किल्ले, दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन, शिवतीर्थ रायगड अशी नितांत सुंदर पुस्तके लिहिली. यातून वाचकांना दुर्गदर्शनाची प्रेरणा मिळाली आणि महाराष्ट्रातील डोंगर भटकंतीला एक दिशा मिळाली. गोनीदा हे फक्त किल्ले हिंडले नाहीत तर त्यांनी ते अनुभवले. गोनीदांचे हे दुर्गसंस्कार नवीन पिढीवर व्हावेत आणि गड- किल्ले मौजमजेचे स्थान नसून स्फूर्तीस्थाने आहेत, हे अधोरेखित व्हावे या उद्देशाने गो. नी. दांडेकर यांच्या जीवनावरील ‘किल्ले पाहिलेला माणूस’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

‘किल्ले पाहिलेला माणूस’ या माहितीपटाचे लेखन व दिग्दर्शन मिलिंद भणगे यांनी केले आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी संलग्न असलेल्या राज्यभरातील विविध जिल्हा संघटना व राज्यातील विविध साहसी संस्था यांच्यावतीने शनिवारी माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. सातारा येथील रानवाटा मंडळ, ठाणे येथील अश्वमेध प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग येथील वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन, मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ, नाशिक येथील गिरिदुर्ग भटकंती बहुउद्देशीय संस्था, बीड येथील दुर्गप्रेमी मंडळ, रायगड येथील निसर्गमित्र यांसह राज्यातील 30 हून अधिक संस्थांनी या माहितीपटाचे यशस्वी आयोजन केले. चेन्नई येथील महाराष्ट्र मंडळ तसेच अमेरिकेतील काही महाराष्ट्र मंडळे यांच्यावतीनेदेखील ‘किल्ले पाहिलेला माणूस’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.

पुण्यात शनिवारी स. प. महाविद्यालयात ज्येष्ठ लेखिका वीणा देव, क्युबिक्स नेटवर्वैचे विजय जोशी, माहितीपटाचे लेखक- दिग्दर्शक मिलिंद भणगे, निमंत्रक निलेश देशपांडे व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांच्या उपस्थितीत माहितीपटाचे दोन शो आयोजित करण्यात आले.