
पाथर्डी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून गेल्या दोन दिवसात शहरातील आठ जणांना चावा घेतला आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या सर्व जखमींना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. कुत्र्याने चावा घेतेल्यांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असून त्यांनाही उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या काही दिवसांपासून एका काळ्या रंगाच्या पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. जखमी अवस्थेत फिरणाऱ्या या कुत्र्याने यापूर्वी दोन ते तीन तरुणांचा चावा घेतला होता. मात्र गेल्या दोन दिवसात या कुत्र्याने शहरातील आठ जणांना चावा घेतला आहे. शहरात असलेल्या उपजिल्हा रग्णालयात साध्या कुत्र्याने चावा घेतल्यास रेबीस न होण्यासाठी दिली जाणारी रॅबीपुरची लस उपलब्ध आहे, मात्र पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यास इमिनो ग्लोबलिंगची लस घ्यावी लागते. ती येथील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने चावा घेतलेल्या सर्व जखमींना नगर येथील शासकीय रुग्णालयात व खासगी दवाखान्यात जावे लागले आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेले जितेंद्र अमोल पटवा (6) व आयुष शीतल बोगावात (5) या लहान मुलांना पुढील उपचारासाठी नगर येथील खासगी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाल्याने सध्या या पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांनी धसका घेतला आहे.



























































